Type Here to Get Search Results !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर

* महादुला नगरपंचायत क्षेत्रात राजकीय रणधुमाळीला सुरुवात!

* 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल ; दररोज नव्या चेहऱ्यांची नावे चर्चेत, नेते - कार्यकर्त्यांची झोप उडाली

कोराडी - महादुला (नागपूर) / मिलिंद गाडेकर :- राज्य निवडणूक आयोगाने अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या घोषणेनंतर महादुला नगर पंचायत क्षेत्रात राजकीय तापमान चांगलेच वाढले असून, नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रचारयुद्धाची तयारी सुरू केली आहे. दररोज नवे उमेदवार, नवे चेहरे चर्चेत येत आहेत आणि गावात राजकीय समीकरणांची लगबग सुरू झाली आहे.

* महादुला नगरपंचायत - राजकीय समीकरणांचा केंद्रबिंदू :-  महादुला नगरपंचायतमध्ये एकूण 17 वॉर्ड असून लोकसंख्य सुमारे 25,000 आहे. गाव दोन भागांत विभागले गेले आहे. एकीकडे कोराडी पॉवर स्टेशन कॉलनी परिसर तर दुसरीकडे स्लम व कामगार वसाहती असलेला भाग. यामुळे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मतदारांची रचना अत्यंत वैविध्यपूर्ण आहे. कोराडीच्या 210 मेगावॅट व 3 x 660 मेगावॅट प्रकल्पांमुळे येथील औद्योगिक आणि शहरीकरणाचा वेग वाढला आहे. याचबरोबर महिला बचत गटांसाठी टेक्सटाईल क्लस्टर आणि शिलाई प्रकल्प उभे राहिल्याने महिला सक्षमीकरणालाही चालना मिळाली आहे. मात्र, या सर्व विकासकामांदरम्यानही बेरोजगारी आणि असंतोषाची लाट काही वस्त्यांमध्ये दिसत आहे. “मुलं शिकलेली, पण काम नाही” या वाक्यात स्थानिकांचा त्रागा स्पष्ट जाणवतो.


* मागील भाजपा कारभारात 200 कोटींची कामे :- महादुला नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर मागील भाजपा सत्ताधारी मंडळाने सुमारे 200 कोटी रुपयांची विकासकामे केली. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वीजपुरवठा या मूलभूत सुविधा सुधारल्या गेल्या. मात्र विरोधकांचा आरोप आहे की, काही कामांचा दर्जा निकृष्ट होता आणि काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी पक्षीय पक्षपात केला.


* टिकिट वाटपात गोंधळ - निरीक्षकही संभ्रमात :- सध्याच्या घडीला भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदे गट) आणि स्थानिक आघाड्या या सगळ्या राजकीय संघटना निवडणुकीसाठी सज्ज आहेत. तिकिट वाटपावरून मात्र गोंधळ उडाला आहे. कारण अनेक कार्यकर्त्यांचा मोठा जनाधार असून ते समाजाभिमुख कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे पक्षीय निरीक्षकांसमोर “कोणाला तिकीट द्यावे आणि कोणाला नाही” हा खरा यक्षप्रश्न बनला आहे.


* प्रचाराला वेग - बॅनर, फ्लेक्स आणि चहापान सभांचा जोर :- प्रचारासाठी पुरेसा अवधी मिळाल्याने सर्वच संभाव्य उमेदवार बॅनर, फ्लेक्स आणि सोशल मीडियाद्वारे आपली उपस्थिती दाखवत आहेत. गावात दिवाळी मीलन, चहापान, आणि रविवारी 'कार्यकर्त्यांच्या ओल्या पार्ट्या’ या माध्यमातून गुप्त मीटिंग्स सुरू झाल्या आहेत. वर्तमानपत्रांमध्येही उमेदवारांनी आपले फोटो प्रसिद्ध करून प्रचाराची नवी पद्धत अवलंबली आहे.


* विकास विरुद्ध असंतोष - मुद्द्यांची लढत तीव्र :- भाजप पक्ष “विकास कामांचा मुद्दा” घेऊन मतदारांकडे जाण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे नवे सामाजिक कार्यकर्ते आणि नव्या पिढीचे नेते “भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक प्रशासन आणि बेरोजगारी निर्मूलन” या मुद्द्यांवर मोहीम राबवत आहेत. स्लम आणि मागास वस्त्यांमध्ये मात्र सत्ताधाऱ्यांविषयी नाराजीचे सूर वाढताना दिसत आहेत.


* उमेदवारांची दमछाक - कागदपत्रे आणि दाखले गोळा करण्याची लगबग :- निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यामुळे आता संभाव्य उमेदवारांना जातीचे दाखले, नाहरकत प्रमाणपत्रे, पासबुक, मालमत्ता विवरणपत्रे तयार करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. ग्रामपंचायत ते तहसील कार्यालयापर्यंत उमेदवारांची गर्दी दिसत आहे.


* महादुल्यात बीजेपी विरुद्ध काँग्रेस :- या निवडणुकीत पारंपरिक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत असणार असली, तरी अनेक स्थानिक गट आणि आघाड्या मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे त्रिकोणी किंवा चौकोनी चुरस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत “विकासाचा मुद्दा की नव्या आशा आणि आकांक्षा” हा खरा निर्णायक प्रश्न ठरणार आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement