Type Here to Get Search Results !

अवघ्या पाच दिवसांत सुपर रँडोनिअर बनले सावर्डेचे पृथ्वी पाटील!

* कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पहिला पाच दिवसीय सुपर रँडोनिअर सायकलपटू 

चिपळूण / विश्वनाथ पंडित :- कोकणाच्या मातीतील एक तरुणाने आपल्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अशक्य वाटणारे शक्य केले. सावर्डे (ता. चिपळूण) येथील तरुण सायकलपटू पृथ्वी कृष्णकांत पाटील याने अवघ्या पाच दिवसांत सुपर रँडोनिअर (Super Randonneur) होण्याचा पराक्रम करून कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सायकलपटू म्हणून आपले नाव इतिहासात कोरले आहे. 


* अवघ्या पाच दिवसांत 1500 किमी अंतराचा पराक्रम :- ऑडेक्स इंडिया रँडोनिअर्स संलग्न सह्याद्री रँडोनिअर्स, चिपळूण यांच्या वतीने आयोजित पाच दिवसीय सुपर रँडोनिअर सिरीजमध्ये पृथ्वी पाटीलने 200, 300, 400 आणि 600 किमी अंतराच्या चारही राईड्स निश्चित वेळेत पूर्ण केल्या. साधारणतः रायडर वर्षभरात या सर्व राईड्स पूर्ण करतो, परंतु पृथ्वीने हा पराक्रम फक्त पाच दिवसांत साध्य केला, जे भारतीय सायकलिंग जगतात दुर्मिळ आणि विलक्षण कामगिरी मानली जाते. 


* शारीरिक ताकद नाही, मानसिक स्थैर्याची खरी परीक्षा :- या सर्व राईड्स स्वतःच्या बळावर (Self-supported) पूर्ण कराव्या लागतात. सायकलपटूने 200 किमी 13.5 तासांत, 300 किमी 20 तासांत, 400 किमी 27 तासांत आणि 600 किमी 40 तासांत पूर्ण करणे आवश्यक असते. अशा कठीण परिस्थितीत मानसिक स्थैर्य आणि शिस्तबद्धता हीच सर्वात मोठी कसोटी असते आणि पृथ्वीने ती उत्तमरीत्या पेलली.


* कराड ते सोलापूर, बारामती, इंदापूर आणि फलटण मार्गांवर सायकल दौड :- सह्याद्री रँडोनिअर्सने या राईड्ससाठी कराड - सोलापूर, कराड - नागज, कराड - बारामती - इंदापूर आणि कराड - फलटण हे आव्हानात्मक मार्ग निश्चित केले होते. पृथ्वीने या सर्व मार्गांवर सलग पाच दिवस सायकल चालवत 1500 किलोमीटर अंतरावर विजय मिळवला.


* डॉक्टर कुटुंबातील क्रीडाप्रेमी पुत्र :- पृथ्वी हा डॉं. कृष्णकांत पाटील आणि डॉं. दर्शना पाटील यांचा सुपुत्र आहे. तो सध्या एमबीबीएस प्रथम वर्षाचा विद्यार्थी असून चिपळूण सायकलिंग क्लबचा सक्रिय सदस्य आहे. शैक्षणिक प्रावीण्यासोबतच त्याने खेळातही विलक्षण क्षमता सिद्ध केली आहे.


* चिपळूण सायकलिंग क्लबकडून जल्लोष :- पृथ्वीच्या या पराक्रमानंतर चिपळूण सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. या यशाबद्दल पृथ्वी म्हणाला की, चिपळूण सायकलिंग क्लबच्या सर्व सदस्यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन नसते तर हे यश शक्य झाले नसते. त्याने सह्याद्री रँडोनिअर्सचे सर्वेसर्वा मनोज भाटवडेकर यांचेही आभार मानले.


* आमदार शेखर निकम यांच्याकडून विशेष सन्मान :- या ऐतिहासिक पराक्रमाबद्दल चिपळूण - संगमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार शेखर निकम यांनी कराड येथे पृथ्वी पाटीलचा विशेष सत्कार करून त्याचे कौतुक केले. कोकणातून असा सुपर रँडोनिअर निर्माण झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. पृथ्वी पाटील आज तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे. जिद्द, परिश्रम आणि शिस्त यांच्या बळावर “अशक्य” हे शब्द खोटे ठरवणारा खरा कोकणचा हिरो आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement