Type Here to Get Search Results !

कॅनरा बँकेचा झिरो बॅलन्स खाते कॅम्प

* सिर्सीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : युको बँकेकडून सेवा न मिळाल्याने नागरिक त्रस्त ; गावात कायमस्वरूपी कॅनरा बँक शाखा स्थापन करण्याची मागणी

सिर्सी (नागपूर) / अखिल रोडे :- सिर्सी गावात कॅनरा बँकेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘झिरो बॅलन्स खाते विशेष कॅम्प’ ला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युको बँकेकडून समाधानकारक सेवा न मिळाल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी सिर्सी येथे कायमस्वरूपी कॅनरा बँक शाखा सुरू करावी, अशी ठाम मागणी केली आहे.

* गावात युको बँक एकमेव, पण सेवांचा अभाव :- सध्या सिर्सी व आजूबाजूच्या गावांसाठी युको बँक एकमेव राष्ट्रीयकृत बँक आहे. शेकडो शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांचे खाते या बँकेत असून, ऑनलाईन सेवा, रोख व्यवहार आणि कर्ज सुविधा यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे गावात दुसरी बँक असावी, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होत होती.


* मनोज दांदडे यांच्या पुढाकारातून उपक्रम :- या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मनोज दांदडे यांनी कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत गावात विशेष कॅम्प आयोजित करण्याची विनंती केली. त्यांच्या पुढाकाराने 7 नोव्हेंबर 2025 रोजी शुक्रवारी सिर्सी सांस्कृतिक भवनात कॅनरा बँकेकडून विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला.


* खाते उघडणी, कर्ज माहिती आणि बँकिंग सेवा :- या कॅम्पदरम्यान नागरिकांना झिरो बॅलन्स खाते उघडण्याची संधी देण्यात आली. सोबतच शेती कर्ज, गृहकर्ज, गोल्ड लोन आणि इतर बँकिंग सेवांची माहिती देखील देण्यात आली. कॅनरा बँकेच्या वतीने सुमित गंगात्रे, प्रदीप बोधेले आणि राजु गडपाईले यांनी नागरिकांची नोंदणी व खाते उघडणीची प्रक्रिया केली, तर आशिष वाडीघरे यांनी नागरिकांना अर्ज भरताना मदत केली.


* स्थानिक पदाधिकारी व नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती :- या कॅम्पला ग्रामपंचायत सिर्सीचे उपसरपंच अतुल नारनवरे, सदस्य सुधाकर चुटे, दिलीप डडमल, दिलीप डाखोळे, प्रफुल फरकाडे, कमलेश दांदडे तसेच अजय मुळे, चेतन कामडी, रोशन मेहरकुरे, अमोल डेकाटे, सतीश अड्डक, शुभम रोडे, राकेश फटिंग, विजय वरघने, गणेश पडोळे, पल्लवी कामडी, यशोदा चुटे आदी नागरिकांनी हजेरी लावली.


* कॅनरा बँक लवकरात लवकर सुरू व्हावी :- कॅनरा बँकेचा कॅम्प संपल्यानंतर नागरिकांनी एकमुखाने मागणी केली आहे की, आम्हाला खाते उघडतांना कोणतीही अडचण आली नाही. कॅनरा बँकेचे अधिकारी संयमी आणि मदतशील आहेत म्हणूनच सिर्सीमध्ये कायमस्वरूपी शाखा सुरू करावी.


या उपक्रमाचे श्रेय मनोज दांदडे यांच्या पुढाकाराला आणि कॅनरा बँक टीमच्या तत्पर सेवाभावाला दिले जात आहे. सिर्सी गावात नागरिकांचा उत्साह पाहता, कॅनरा बँक शाखा लवकरच सुरू होण्याची शक्यता स्थानिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement