* पक्षसंघटनेसाठीच्या दीर्घ योगदानाची दखल
* प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्णय
वसई / प्रतिनिधी :- वसई - विरार शहर जिल्हा काँग्रेसमध्ये संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते कुलदीप वर्तक यांची वसई - विरार शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली असून, वर्तक यांना नियुक्तीपत्र देत आगामी वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.
कुलदीप वर्तक हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्ष संघटनेसाठी सातत्याने व निष्ठेने कार्यरत आहेत. वसईत काँग्रेस पक्षाला ऊर्जा मिळवून देणारे ज्येष्ठ नेते स्व. मायकल फुर्ट्याडो यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय घडण झालेल्या वर्तक यांनी संघटनात्मक कामकाजात आपली वेगळी छाप पाडली आहे. पक्षासाठी दिलेले योगदान, केलेली आंदोलने, जनतेशी सातत्याने राखलेला संपर्क आणि कामाचा सविस्तर अहवाल नियमितपणे पक्षश्रेष्ठींना सादर करण्याची कार्यपद्धती यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
बहुधर्मीय आणि बहुभाषिक अशा वसई तालुक्यात सर्व समाजघटकांशी साधलेला उत्तम संवाद, पक्षातील ज्येष्ठ व तरुण कार्यकर्त्यांशी असलेले सलोख्याचे संबंध तसेच प्रदेश स्तरावरील अनेक नेत्यांशी असलेले स्नेहसंबंध हे वर्तक यांचे बळ मानले जाते.
आपल्या नियुक्तीनंतर बोलताना वसई - विरार जिल्हा कार्याध्यक्ष कुलदीप वर्तक म्हणाले की, पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दाखविलेला विश्वास मी प्रामाणिकपणे सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करीन. काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी सक्रिय राहणार आहे.
कुलदीप वर्तक यांच्या निवडीनंतर काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी तसेच समवयीन कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. काँग्रेस पक्ष हा राज्यातील महाविकास आघाडीतील एक महत्त्वाचा घटक असल्याने, वर्तक यांच्या या नियुक्तीला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


Social Plugin