* 250 एकरांवर औद्योगिक वसाहतीची उभारणी
* बेरोजगारांच्या हाताला रोजगाराची नवी आशा
नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा रेल्वे स्थानकालगत पूर्वी कार्यरत असलेल्या सहकारी तत्त्वावरील सुतगिरणीमुळे परिसरातील हजारो बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळत होता. मात्र, काही कारणास्तव ही सुतगिरणी कालांतराने बंद पडली आणि त्यामुळे अनेक कुटुंबांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. रोजगाराच्या शोधात अनेकांना स्थलांतरावे लागले. बंद पडलेला हा परिसर दीर्घकाळ निर्जन आणि ओसाड अवस्थेत पडून होता.
या पार्श्वभूमीवर नगरदेवळा परिसराला पुन्हा औद्योगिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पाचोरा-भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नगरदेवळा येथे सुमारे 250 एकर क्षेत्रावर औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) मंजूर झाली आहे. संबंधित जागेचे आरक्षण व उद्योग उभारणीसाठी आवश्यक चिन्हांकनाचे काम पूर्ण झाले असून, आता पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
* उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक :- औद्योगिक वसाहतीच्या विकासाला गती देण्याबाबत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याची दखल घेत बुधवारी नागपूर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मुख्य कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून नगरदेवळा औद्योगिक वसाहतीतील आवश्यक सुविधा, गुंतवणूकदार, उद्योग उभारणी याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.
* उपमुख्यमंत्र्यांचा थेट हस्तक्षेप :- नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पाचोरा-भडगावात आले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेतूनच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत नगरदेवळा सुतगिरणी परिसरातील मंजूर औद्योगिक वसाहतीत तातडीने सुविधा उपलब्ध करून उद्योग उभारणीबाबत आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहे.
* कृषीपूरक उद्योगांना चालना :- नगरदेवळ्यात औद्योगिक वसाहत उभारली गेल्यास परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळणार असून कृषी क्षेत्राशी निगडित उद्योग, प्रक्रिया उद्योग, वेअरहाऊस, लघु व मध्यम उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे. यामुळे संपूर्ण पाचोरा-भडगाव तालुक्याच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळेल.
* आमदार किशोर पाटील यांचा विश्वास :- पाचोरा-भडगाव तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी मंजूर एमआयडीसीमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून उद्योग आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. या दृष्टीने उद्योग मंत्र्यांची बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, असे पाचोरा-भडगाव विधानसभेचे आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले.


Social Plugin