* आरपीआय नेत्यावर हल्ला झाल्याची एफआयआर दाखल
* दोन्ही गटांकडून परस्पर तक्रारी, पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त
कर्जत / नरेश जाधव :- कर्जत शहरातील राजकीय वातावरण तापले असून त्याचे पडसाद बुध्दनगर परिसरातील बौद्धवस्तीत उमटले. येथे दोन गटांमध्ये वादाला आकार देत मारहाणीपर्यंत प्रकरण गेले. दोन्ही बाजूंनी पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत.
* राकेश नागदेव : आरपीआय नेत्याच्या नातेवाईकांकडून मारहाण :- तक्रारदार राकेश अशोक नागदेव यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 3 डिसेंबर रोजी दुपारी अंदाजे 1.45 वाजता ते बुध्दनगर येथील समाजमंदिराजवळ वाचनालयाच्या शेजारी बसलेले असताना राहुल डाळींबकर व त्याचा मुलगा आलोक डाळींबकर तेथे आले.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांनी “काल काय झाले ?” अशी विचारणा केल्यावर त्यांच्यात वाद निर्माण झाला. आरोपानुसार राहुल डाळींबकर यांनी “गावात राहू देणार नाही” अशी धमकी दिली, त्यांची गळपट्टी पकडून कानाखाली मारली, आलोक डाळींबकर यांनी लाकडी दांडक्याने हातावर फटका दिला, तसेच अजय उर्फ राजू डाळींबकर व सिद्धांत डाळींबकर यांनी देखील मारहाण केली.
तक्रारीनुसार त्यांच्या MH-05-CR-2689 या बुलेट मोटरसायकलची दांडक्याने व दगडाने मोडतोड, झटापटीदरम्यान टी-शर्ट फाडला गेला, दोन तोळ्यांची सोन्याची चेन तुटून हरवली असे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी नागदेव यांनी मारहाण, नुकसान आणि चोरीसंदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
* डाळींबकर गटाच्या हकिकतीतून वेगळा आरोप :- या घटनेनंतर समोर आलेल्या डाळींबकर गटाच्या निवेदनानुसार, 3 डिसेंबर रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास ते वाचनालयाजवळून जात असताना राकेश नागदेव यांनी त्यांच्याशी उद्धटपणे वागणूक केली.
हकिकतीनुसार, विचारणा केल्यावर नागदेव यांनी तक्रारदाराला “महार कधीच सुधारणार नाही” अशा प्रकारचे जातिवाचक शब्द वापरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच एफआयआर मजकुरानुसार नागदेव यांनी हातातील लोखंडी कड्याने डाव्या डोळ्याखाली मारहाण केल्याचे नमूद तसेच तक्रारदाराला खाली पाडून चॉपर घेऊन धावून आल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारी नोंदवल्या आहेत.
दरम्यान, राकेश नागदेव याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
* परिसरात तणाव, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त :- वादाच्या दोन्ही घटना सार्वजनिक ठिकाणी घडल्याने बुध्दनगर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. दोन्ही गट पोलिस ठाण्याबाहेर जमल्याने वातावरण आणखीनच ढवळून निघाले. पोलिसांनी तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवत परिसरात बंदोबस्त वाढविला.
कर्जत पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून कोणताही अनिष्ट प्रकार होऊ नये म्हणून सतत गस्त व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे.


Social Plugin