गुहागर / रामदास धो. गमरे :- बौद्धजन सहकारी संघ, शाखा क्र. ९, मौजे वरवेली (ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी) व बौद्ध विकास मंडळ, वरवेली (ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी ) यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन व पवित्र अस्थिकलश अभिवादन सभा असे दुहेरी कार्यक्रम शनिवार, ६ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई शाखा अध्यक्ष राजेश वसंत पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला असून महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम परिवेण बुद्धविहार, वरवेली येथे तर पवित्र अस्थिकलश अभिवादन सभा माता रमाई भिमराव आंबेडकर सभागृह येथे संध्याकाळी ५ वाजता घेण्यात येईल.
या कार्यक्रमाची सुरुवात ५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता गावातून अभिवादन रॅली काढून करण्यात येईल, रात्री ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते अस्थिकलश व प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलन करण्यात येईल, रात्री ११:३० ते १२ बौद्धाचार्य शशिकांत जाधव व माजी श्रामणेर मयूर पवार यांच्या सुमधुर वाणीने सामुदायिक बुद्ध वंदना व धार्मिक पूजापाठ होईल व रात्री १२ वाजता पवित्र अस्थिकलश सर्वांस दर्शनासाठी खुला करण्यात येईल. ६ डिसेंबर २०२५ रोजी महापरिनिर्वाण दिन व अभिवादन सभेचा कार्यक्रम घेण्यात येईल. या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष गाव शाखा अध्यक्ष वैभव ल. पवार असून कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा राहुल बाळकृष्ण पवार व अमोल सु. पवार सांभाळतील तर ओबीसी नेते, शिवव्याख्याते, फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रचारक राजाराम पाटील यांचे व्याख्यान होणार आहे तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बौद्ध विकास मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात करण्यात आले आहे.


Social Plugin