Type Here to Get Search Results !

पुलाचीवाडीतील श्री दत्त मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला

* दत्त जयंतीनिमित्त नामस्मरण सोहळा, पारायण, कीर्तन आणि महाप्रसादाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्जत / राजेंद्र शिवाजी जाधव :- दत्त जयंतीनिमित्त पुलाचीवाडीतील श्री दत्त मंदिर परिसर गेल्या काही दिवसांपासून भक्तिमय वातावरणाने दुमदुमला होता. नामस्मरण सोहळा, श्रीगुरुचरित्र पारायण, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण गावात श्रद्धा, एकोपा आणि उत्साहाचे अद्वितीय दर्शन घडले.


* महाअभिषेकाने भक्तिमय सोहळ्याची सुरुवात :- सोहळ्याचा शुभारंभ मार्गशीर्ष शुक्ल 14, पौर्णिमा गुरूवार रोजी श्री समर्थ दत्तांच्या महाअभिषेकाने झाला. त्यानंतर दिवसभर काकड आरती, शंखघंटा निनाद, ध्वजपूजन, वेदमंत्रोच्चार, गुरुपाठ आणि विविध वैदिक धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पडले. विशेष महापाठ, भजन, प्रवचन तसेच सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहामुळे मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.


* किर्तनसेवेचा भक्तिरस ओतप्रोत भरलेला सुवर्णक्षण :- सायंकाळी आयोजित केलेल्या किर्तन आणि प्रवचन कार्यक्रमांनी वातावरण अधिकच पावन व अध्यात्ममय केले. सुप्रसिद्ध किर्तनकार व प्रवचनकारांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले. महिला वर्ग, युवक, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत भक्तिरसाचा आंनद लुटला.


* महाप्रसादास भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग :- दत्त जयंतीनिमित्त भाविकांसाठी आयोजित महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला. गर्दीचे उत्कृष्ट नियोजन, स्वयंसेवकांचे समन्वय आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे संपूर्ण सोहळा सुरळीत पार पाडण्यात आला.


* श्रद्धा, संस्कार आणि एकोप्याचे दर्शन घडविणारा उत्सव :- दत्त जयंतीनिमित्त पुलाचीवाडीमध्ये सलग अनेक दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थ, भाविक आणि मान्यवरांच्या एकत्र सहकार्यामुळे हा उत्सव अत्यंत यशस्वी ठरला. दत्तांचे जयघोष, टाळ-चिपळ्यांचा निनाद आणि भक्तीगीतांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या सर्व कार्यक्रमाचे व्यवस्थापन गुरुदत्त सेवा मंडळ, पुलाचीवाडी आणि महिला मंडळ, पुलाचीवाडी यांनी केले होते.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement