* रत्नाई कृषि महाविद्यालयाच्या कृषीकन्यांकडून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
इंदापूर / प्रतिनिधी :- इंदापूर तालुक्यातील बावडा गावात शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संस्थेच्या रत्नाई कृषि महाविद्यालय, अकलूज (महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत) यांच्या वतीने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा मंगळवार, 9 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालयात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या कृषीकन्यांनी शेतकरी बांधवांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची सखोल माहिती दिली.
महाविद्यालयाच्या वतीने बावडा गावात पुढील सहा महिने कृषि कार्यानुभव कार्यक्रम राबविण्यात येणार असून, या कालावधीत गावातील शेतकरी बांधवांना शेतीशी संबंधित नवनवीन तांत्रिक माहिती देण्यात येणार आहे. कृषिदूत म्हणून कार्य करणाऱ्या विद्यार्थिनींनी पिकांची योग्य निवड, लागवड पद्धत, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, सुधारित सिंचन पद्धती तसेच काढणी व साठवणूक याबाबत उपयुक्त व शास्त्रीय मार्गदर्शन केले.
* शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष उपयोगी माहिती :- कार्यक्रमात शेतकऱ्यांना पिकाची लागवड करण्यापासून ते काढणीपर्यंतच्या प्रक्रियेची थोडक्यात मात्र उपयुक्त माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांनीही या मार्गदर्शनाला सकारात्मक प्रतिसाद देत शंका विचारल्या व आधुनिक शेती पद्धतींबाबत उत्सुकता व्यक्त केली.
या कार्यक्रमाला पल्लवी गिरमे (सरपंच), रणजीत घोगरे (उपसरपंच), अंबिका पावसे (ग्रामसेवक), अक्षय कुंभार (कृषि सहाय्यक अधिकारी) यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रगतशील शेतकरी, समस्त शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* कृषीकन्यांचा सक्रिय सहभाग :- या उपक्रमात कृषीकन्या साक्षी बोराटे, सुनैना जाधव, प्रतीक्षा जाधव, श्रद्धा जाधव, श्रद्धा इंगोले, अनामिका कोळेकर, प्राची कोंढाळकर, कीर्ती कोळी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमास प्राचार्य आर. जी. नलावडे (प्राचार्य, रत्नाई कृषि महाविद्यालय, अकलूज), एस. एम. एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक), प्रा. एम. एम. चंदनकर (कार्यक्रम अधिकारी), प्रा. एच. व्ही. खराडे (कार्यक्रम अधिकारी) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


Social Plugin