Type Here to Get Search Results !

सामाजिक प्रेरणास्रोत: डॉ. बाबा आढाव

१९९२ साली आमची पुणे शहरातील सामाजिक कार्य पाहण्यासाठी अभ्यास सहल गेली होती. त्यावेळी डॉं. बाबा आढाव यांच्या हमाल पंचायत, श्रमिक, कष्ठकरी चळवळीच्या केंद्राला आम्ही भेट दिली. अतिशय साध्या कार्यकर्त्यांचे दर्शन आम्हाला झाले. तोपर्यंत सोशल वर्क म्हणजे सुटाबुटातील कार्य अशी आमची समजूत झाली होती, मनातील भाव संवेदना बदलण्याचे काम त्यांच्या एका भेटीने झाले. अहमदनगर महाविद्यालयासमोरील ग्रामीण विकास व अध्ययन केंद्रातून आम्ही एम. एस. डब्ल्यू होऊन बाहेर पडलो, तेव्हा समाज कार्याबद्दल चांगली समज आली होती. डॉं. बाबा आमटे, डॉं. बाबा आढाव, डॉं. नरेंद्र दाभोळकर, मोहन धारिया, पदमश्री आण्णा हजारे यांच्या सामाजिक कार्याबद्दल अधिकाधिक माहिती घेऊन त्यांना भेटण्याची कायम  उत्सुकता असे. 


महात्मा फुले, शाहू महाराज, डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा झुंजार कृतिशिल नेता गेला. परिवर्तनवादी सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे असंख्य कार्यकर्ते पोरके झाले. गरीब कष्टकरी, दलित, भटके विमुक्त, उपेक्षित, वंचितांच्या हकासाठी लढणारे डॉं. बाबा आढाव आपल्यामध्ये आता नाहीत. पण त्यांच्या अनेक स्मृती आयुष्यभर सोबत राहतील. त्यांचे कार्य त्यांच्या चळवळीच्या रूपाने पाठीमागे राहिले आहे. वयाच्या ९४ व्या वर्षीही ते अन्यायाविरुद्ध पेटून उठत. असे करतांना कुठल्याही शासनाची त्यांनी परवा केली नाही. गरीबांच्या न्याय हक्कासाठी अन्यायग्रस्ताच्या बाजूने ते कायम उभे राहत. फुले, शाहू, डॉं. आंबेडकर, महर्षी वि. रा. शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे महाराज, महात्मा गांधी, डॉं. राममनोहर लोहिया यांच्या विचारांचा खराखुरा वारसदार आपल्यातून निघून गेला. महाराष्ट्रातील कष्टकरी हमाल, पुण्यातील रिक्षावाले, भंगार गोळा करणारे गरीब व घरेलु कामगार, राज्यातील शेतमजूर, भटके विमुक्त झोपडपट्टीवाले या चळवळीचा मार्गदर्शक आणि सच्चा आधारस्तंभ हरपला.

     

पद्मश्री अण्णासाहेब हजारे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प योजनेमध्ये डॉं. रमेश वाघमारे, सुनील गायकवाड आम्ही जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत होतो. त्यावेळी डॉं. बाबा आढाव एकदा राळेगणसिद्धी येथे आले होते, त्यावेळी त्यांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांसमोर अत्यंत महत्त्वाचे समाजकार्यातील पदर उलगडून दाखवले होते. त्यांनी सुरू केलेली एक गाव एक पाणवठा ही संकल्पना त्यावेळी समजून सांगितली होती. त्यानंतर पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना अनेक वेळा डॉं. बाबांच्या सोबत चर्चा करण्याचे प्रसंग आले. विशेषता अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमात त्यांची भेट होत असे. हमाल पंचायतचे तत्कालीन अध्यक्ष स्व. शंकरराव घुले आण्णा आणि कॉं. बाबा आरगडे यांची बाबांवरती अपार श्रद्धा असल्याने सर्व कार्यक्रमाला ते उपस्थित राहत असत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर शहरांमध्ये सुरू झालेल्या विविध चळवळीसाठीही ते वेळ देत असत.

    

अहमदनगरच्या मार्केट यार्डमध्ये कष्टकरी महिला म्हणून काम केलेल्या यमुनाबाई पांडुळे यांच्या 75 वी निमित्ताने लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमासाठी ज्ञानदेव पांडुळे यांच्या पुढाकाराने डॉं. बाबा आढाव यांना आमंत्रित करण्यात आले होते, त्यावेळी हमाल पंचायत पासून ते लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय सर्व हमाल बंधु सह ते पायी चालत कार्यक्रमस्थळी उपस्थित राहिले. त्यावेळी मार्केट यार्डमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ते कार्यक्रमस्थळी पोहोचले होते. अत्यंत उत्साहामध्ये यमुनाबाई पांडुळे यांच्या 75 वीचा कार्यक्रम डॉं. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी बाबांनी जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकून उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. सर्वांसाठी ठेवलेल्या स्नेहभोजनातच त्यांनी स्वतः पंगतीला बसून सर्वांच्या सोबत जेवण केले. आपणही कष्टकऱ्यातील एक असल्याची जाणीव त्यांच्यामध्ये सातत्याने असे आणि तीच जाणीव आपल्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये यावी यासाठी ते प्रयत्नशील असत. कॉं. बाबा आरगडे हे डॉं. बाबा आढाव यांच्या सर्व आंदोलनामध्ये सातत्याने सहभागी होत असत, त्यामुळे त्यांची सर्व खबरबात आमच्यापर्यंत पोहोचत असे.

    

जमिनीवर पाय ठेवून असलेल्या या सामाजिक योध्दांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्रातील एक संघर्ष योद्धा हरपला असून ही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. अशा या निस्वार्थी, तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या डॉं. बाबा आढाव यांना शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. 


- सुनील गोसावी                                                        संस्थापक, सचिव                                                      शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य (मो. क्र. ९९२१००९७५०)

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement