* सकारात्मक पत्रकारितेचा गौरव ; समाजपरिवर्तन घडवणाऱ्या ध्येयवादी पत्रकारांचा मुंबईत सन्मान
मुंबई / प्रतिनिधी :- समाजातील सर्वसामान्यांच्या समस्या सोडवून सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या राज्यातील 15 पत्रकारांचा ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025’ देऊन मुंबईत भव्य सोहळ्यात गौरव करण्यात आला. 'व्हॉईस ऑफ मीडिया’, ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ आणि राज्य शासनाच्या ‘आयुष्यमान भारत समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 1 फेब्रुवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत किमान 42 किंवा त्याहून अधिक परिणामकारक, सकारात्मक बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली.
* पुरस्कारप्राप्त पत्रकारांची यादी :- या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पुढील पत्रकारांची निवड करण्यात आली. कुणाल लाडे (डहाणू), संदेश साळुंके (रायगड), शाहिद पठाण (गोंदिया), रुपेश बाजड (वाशिम), राहुल पवार (कराड), स्वप्निल कांबळे (राधानगरी), ईश्वर महाजन (अमळनेर), महेंद्रसिंग गिरासे (शिंदखेडा), भारत सवणे (परतूर), विनोद कांबळे (लातूर), लियाकत पठाण (नाशिक - उर्दू विंग), सारिका शिंदे (ठाणे - महिला विंग), संदीप पिंपळकर (वाशिम - साप्ताहिक विंग), महेश जगताप (पुणे - रेडिओ विंग) आणि मल्हारी ओमासे (सांगली – डिजिटल विंग).
पुरस्कार स्विकारतांना पत्रकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कुणाल लाडे यांनी ग्रामीण भागातील समस्यांना सकारात्मक न्याय दिल्याची ही पावती असल्याचे सांगितले. संदेश साळुंके यांनी लोकहिताच्या पत्रकारितेला मिळालेला हा सन्मान असल्याचे नमूद केले. शाहिद पठाण यांनी हा सन्मान संघर्षाचा मान असल्याचे सांगितले, तर रुपेश बाजड यांनी सकारात्मक पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले. राहुल पवार आणि स्वप्निल कांबळे यांनी या पुरस्कारामुळे लेखणीला नवी ताकद मिळाल्याची भावना व्यक्त केली. ईश्वर महाजन यांनी केवळ प्रश्न मांडणे नव्हे, तर त्यावर तोडगा सुचवणे ही खरी पत्रकारिता असल्याचे सांगितले. महेंद्रसिंग गिरासे यांनी सकारात्मक वार्तांकनातून समाजक्रांती घडवण्याचा विश्वास व्यक्त केला.
* विविध माध्यमांचा सन्मान :- या पुरस्कारांमध्ये उर्दू, महिला, साप्ताहिक, रेडिओ आणि डिजिटल माध्यमातील पत्रकारांचाही गौरव करण्यात आला. त्यामुळे पत्रकारितेच्या विविध अंगांना व्यासपीठ मिळाले आहे. या सोहळ्यास कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, आयुष्यमान समितीचे अध्यक्ष डॉं. ओमप्रकाश शेटे, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, शेतकरी नेते रविकांत तुपकर, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, अप्पर पोलिस आयुक्त महेश पाटील, उद्योगपती राणा सूर्यवंशी तसेच विविध न्यूज चॅनेलचे संपादक उपस्थित होते.
* सकारात्मक पत्रकारितेचा नवा आदर्श :- 78 देशांमध्ये 4.70 लाखांहून अधिक सदस्य असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेने पत्रकारांच्या कल्याणासोबतच सकारात्मक पत्रकारितेला चालना देण्यासाठी उचललेले हे पाऊल मैलाचा दगड ठरणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी सर्व पुरस्कारप्राप्त पत्रकारांचे अभिनंदन करीत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.



Social Plugin