* हाफिज मुकद्दस रेयान यांचा सत्कार : रात्रभर इबादत, सामूहिक दुआ ; पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी
सिरसी (नागपूर) / अखिल रोडे :- रमजान शरीफच्या पवित्र महिन्यातील 27 व्या शबे-कद्र निमित्त सिरसी येथील जामा मशिदीत धार्मिक उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पवित्र प्रसंगी मशिदीचे पेश इमाम हाफिज मुकद्दस रेयान साहब यांनी कुरआन शरीफचे मुकम्मल (पूर्ण) पठण करून धार्मिक वातावरण अधिकच पवित्र केले.
* हाफिज मुकद्दस रेयान यांचा जंगी सत्कार :- या महत्त्वपूर्ण धार्मिक कार्याबद्दल जामा मशीद समिती आणि मुस्लिम जमात तर्फे हाफिज मुकद्दस रेयान यांचा जंगी सत्कार करण्यात आला. जामा मशिदीचे अध्यक्ष जनाब शकील पठाण, सचिव जनाब हनीफ शेख आणि सर्व समिती सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे इस्तकबाल (स्वागत) केले.
* रात्रभर इबादत आणि कुरआन पठण :- शबे-कद्रच्या औचित्याने मुस्लिम बांधवांनी रात्रभर मशिदीत उपस्थित राहून नमाज अदा केली, कुरआन पठण केले आणि अल्लाहची विशेष इबादत केली. या दिवशी केलेली प्रार्थना अत्यंत फलदायी मानली जात असल्याने भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.
* देशासाठी सामूहिक दुआ :- कार्यक्रमाच्या शेवटी देशाच्या प्रगतीसाठी, शांततेसाठी आणि समाजातील सौहार्द टिकून राहण्यासाठी सामूहिक दुआ (प्रार्थना) करण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमाला सिरसी परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तीमय वातावरण आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
* पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त :- कार्यक्रमादरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी बेला पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी असलम नवरगाबंदे, अमोल कोटवार तसेच वाहतूक विभागाचे सतीश फुटाणे, अमोल काळे, कुंभारे यांनी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला. वाहतुकीची कोंडी होऊ नये याची विशेष काळजी घेतल्यामुळे भाविकांना कोणताही त्रास न होता इबादत करता आली.
* पोलिस प्रशासनाचे आभार :- या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलिस प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल जामा मशिद समिती व मुस्लिम जमात तर्फे आभार व्यक्त करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यामुळे सिरसी परिसरात श्रद्धा, शांतता आणि एकात्मतेचा सुंदर संदेश दिला गेला.


Social Plugin