Type Here to Get Search Results !

5 हजारांच्या स्टॅम्पसाठी 5500 रुपयांची मागणी, दोघांना रंगेहात अटक

* पाचोर्‍यात लाचप्रकरण उघड : एसीबीची कारवाई

* अधिकृत स्टॅम्प वेंडर आणि भावाविरोधात गुन्हा दाखल

पाचोरा / प्रतिनिधी :- पाचोरा शहरात स्टॅम्प विक्रीदरम्यान शासकीय दरापेक्षा अधिक रक्कम मागून लाच स्विकारल्याचा प्रकार उघडकीस आला असून जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून दोघांना रंगेहात पकडले आहे. या प्रकरणात अधिकृत स्टॅम्प वेंडर योगेश ईश्वरलाल संघवी (वय 49) आणि त्यांचा भाऊ प्रशांत संघवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे 15 मार्च 2026 रोजी जामनेर - पाचोरा रोडवरील ‘प्रशांत झेरॉक्स’ येथे 500 रुपयांच्या दराचे 10 स्टॅम्प खरेदी करण्यासाठी गेले होते. यावेळी 5,000 रुपयांच्या स्टॅम्पसाठी 5,500 रुपये देण्याची मागणी करण्यात आली. प्रत्येक स्टॅम्पमागे 50 रुपये जादा आकारण्याचा आग्रह धरत ही रक्कम कमी होणार नसल्याचे संघवी यांनी स्पष्ट केले. या प्रकारामुळे तक्रारदारांनी थेट जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली.


तक्रारीनंतर एसीबीने 17 मार्च 2026 रोजी सापळा रचला. पडताळणीदरम्यान योगेश संघवी यांनी पुन्हा 500 रुपयांची अतिरिक्त रक्कम मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या सांगण्यावरून प्रशांत संघवी यांनी पंचासमक्ष ही 500 रुपयांची लाच रक्कम स्विकारली, त्याच वेळी एसीबी पथकाने कारवाई करीत दोघांना रंगेहात पकडले. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, पोलिस अंमलदार बाळू मराठे, भूषण पाटील तसेच तपास अधिकारी स्मिता नवघरे यांचा समावेश होता. या कारवाईमुळे पाचोरा शहरात खळबळ उडाली असून शासकीय व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखण्याचा संदेश एसीबीकडून देण्यात आला आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement