Type Here to Get Search Results !

नगरदेवळ्यात सिलेंडर वितरण सुरळीत

* सरपंचांच्या पुढाकाराने नागरिकांना दिलासा

* ग्रामसचिवालयाजवळ केंद्रीकृत व्यवस्था

* ऑनलाईन नोंदणीनुसार शिस्तबद्ध वितरण

नगरदेवळा / प्रतिनिधी :- आखाती भागातील इराण - अमेरिका - इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधनटंचाईची भीती निर्माण झाल्याने घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. काही ठिकाणी सिलेंडर वितरणादरम्यान वाद व गोंधळाचे प्रकार घडत असतांना नगरदेवळा येथे मात्र सरपंचांच्या पुढाकारामुळे वितरण प्रक्रिया सुरळीत ठेवण्यात यश आले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

* गल्लीनिहाय वितरण थांबवून केंद्रीकृत व्यवस्था :- पूर्वी गल्लोगल्ली वाहनांद्वारे सिलेंडर वाटप होत असतांना किरकोळ वाद, भांडणे आणि गोंधळाचे प्रकार घडत होते. याची दखल घेत सरपंच प्रतिक्षा किरण काटकर यांनी तात्काळ निर्णय घेत गल्लीनिहाय वितरण व्यवस्था तात्पुरती थांबवली. त्याऐवजी ग्रामसचिवालयाजवळ केंद्रीकृत वितरण व्यवस्था सुरू करण्यात आली, जिथे ऑनलाईन नोंदणी केलेल्या ग्राहकांना क्रमांकानुसार रांगेत उभे राहून व्यवस्थितपणे सिलेंडर दिले जात आहेत.


* दोन प्रमुख गॅस एजन्सींचे वितरण :- नगरदेवळा येथे गिरणा गॅस, पाचोरा आणि इंडेन गॅस एजन्सी या दोन प्रमुख एजन्सींचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर आहेत. इंडेन गॅसचे वितरण हॉटेल साईश्रद्धा जवळील कार्यालयातून एचपी (HP) गॅसचे वितरण ग्रामसचिवालयाजवळून अशा पद्धतीने नियोजनबद्ध रितीने सुरू आहे.


* सरपंच व टीमची सतत देखरेख :- या संपूर्ण व्यवस्थेवर सरपंच पती प्राचार्य किरण काटकर आणि त्यांची टीम सातत्याने लक्ष ठेवून आहे. प्रत्येक नोंदणीकृत ग्राहकापर्यंत सिलेंडर पोहोचावा यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


* नागरिकांचाही शिस्तबद्ध सहभाग :- नगरदेवळा येथील नागरिकांनीही शांतता राखत ऑनलाईन नोंदणी करून आपल्या क्रमांकानुसार सिलेंडर स्विकारत आदर्श निर्माण केला आहे. कोणताही गोंधळ न करता शिस्तीत सहकार्य केल्यामुळे ही व्यवस्था यशस्वी ठरत आहे.


* आखाती तणावाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम :- पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुज सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या कच्च्या तेलाच्या वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. याचा परिणाम सौदी अरेबिया, यूएई, कतार, इराक, बहरीन यांसारख्या देशांतून भारतात होणाऱ्या आयातीवर होत आहे. या पार्श्वभूमीवर काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने ऑनलाईन गॅस बुकिंग प्रणाली अनिवार्य केली आहे.


* संयम राखण्याचे आवाहन :- इंधन वाहतुकीचे मार्ग लवकरच सुरळीत होतील आणि पुढील 15 दिवसांत परिस्थिती सुधारेल, असा अंदाज शासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, प्राचार्य किरण काटकर यांनी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. 

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement