* एकेकाळी 12 नगरसेवक निवडून आणणारा रिपब्लिकन पक्ष मुंबईत कुठे ?
मुंबई / फिरोज पिंजारी :- रिपब्लिकन पक्षाची देशभर घोडदौड सुरु आहे. नागालँन्डसारख्या राज्यात रिपब्लिकन पक्षाचे 2 आमदार निवडुन आले आहे. मणिपुरमध्ये पक्षाला 17 टक्के मतदान मिळुन पक्ष मान्यता प्राप्त झाला आहे. मुंबईत मात्र रिपाइंच्या उमेदवारांना मतदान मिळत नाही. अनेक वॉर्डात आपला पाठिंबा नसला तरी मित्रपक्षाचे उमेदवार निवडुन येतात. एकेकाळी मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे 12 नगरसेवक निवडुन आले होते, मुंबईचे महापौर पद ही रिपब्लिकन पक्षाला मिळाले होते. आता मुंबईतल्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्ष कुठे आणून ठेवलाय याचे आत्मपरिक्षण करावे, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईतील पदाधिकारी कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले.
ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी चार पावले मागे येवून तरुण पिढीला संधी दिली पाहिजे. दलित पँथरसारखी तरुणांची फौज उभी केली पाहिजे. युती झाली नाही तरी स्वबळावर उमेदवार निवडुन आणता आले पाहिजे. केवळ बौध्दांच्या मतांवर उमेदवार निवडुन येणार नाहीत. सर्व समाजांना सोबत घेवून मुंबईत रिपब्लिकन पक्षाची मजबूत पुर्नबांधणी करा, असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना केले.
चेंबुर येथील फाईन आर्ट सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांच्या पुढाकारातुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी पुज्य बौध्द धम्मगुरु डॉं. राहुलबोधी महाथेरो यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मी राज्यात कॅबिनेट मंत्री होतो, त्यानंतर मी तीनवेळा लोकसभेत निवडून आलो. आता राज्यसभेत तीनवेळा निवडून आलो आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मी तीनवेळा राज्यमंत्री झालो आहे. मी कुणाला मागायला गेलो नाही, राजकारणात मागून मिळत नाही. माझ्या पाठिशी गोरगरीब जनता, झोपडीवासी, दलित, बहुजन, आदिवासी उभा आहे आणि सर्व महाराष्ट्राने मला ताकद दिली म्हणून मी दिल्लीचे तख्त गाठू शकलो. राज्यात एकही असे गांव नसेल जिथे माझा संपर्क झालेला नाही. संपूर्ण देशात मी डॉं. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष पोहचवला आहे. मला एकट्याला सत्ता नको, माझ्या सहका-यानाही सत्तेत सहभाग दिला पाहिजे मात्र माझ्या सहका-यांना सत्तेत सहभाग मिळत नाही. आपण तळागाळातील जनतेशी संपर्क ठेवून त्यांचे प्रश्न सोडविले पाहिजेत. सतत लोकांचा पाठिंबा आपल्याला मिळत राहिला पाहिजे, तसे होत नाही त्यामुळे कदाचित राज्यात माझ्या सहका-यांना सत्तेत सहभाग मिळत नसेल. मुंबईत आणि राज्यात पक्षाची प्रचंड ताकद आहे. ती जागृत केली पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले. मी कधीच मित्रपक्षाच्या चिन्हांवर निवडणुक लढलो नाही. आपल्या पक्षांवर आपण प्रेम केले पाहिजे. गन्ना किसान हे आपल्या पक्षाला निवडणुक चिन्ह मिळाले आहे. आपल्या पक्षाच्या चिन्हांवर निवडणुक जिंकता आली पाहिजे. त्यासाठी नियोजन करुन पक्षबांधणी करा, असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.
माझ्या भिमामुळे माझ्या कामाला येत आहे आकार,
म्हणून चेंबुरमध्ये होत आहे माझा सत्कार
माझ्या आयुष्यात मी कधी मानली नाही हार
कारण मी दुश्मनांवर करीत आलो वार
सर्वांसाठी माझे उघडे असते दार
कारण देशभरात जागी केली दलित नार
अशी कविता ना. रामदास आठवले यांनी सादर केली.
यावेळी या सत्कार सोहळ्याचे संयोजक जिल्हाध्यक्ष संजय डोळसे, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, सुरेश बारसिंग, फुलाबाई सोनवणे, ॲंड. आशाताई लांडगे, शिलाताई अनिल गांगुर्डे, उषाताई रामलू, अभयाताई सोनवणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धिरज उबाळे, शिवसेना नगरसेविका समृध्दी काते, भाजप नगरसेविका आशा मराठे, रिपाइंचे मुंबई कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड, रिपाइंचे मुंबई सरचिटणीस विवेक पवार, अल्पसंख्यांक आघाडी मुंबई अध्यक्ष सोहेल शेख, अजित रणदिवे, रमेश गायकवाड, बाळासाहेब बनसोडे, रवि गायकवाड, सुभाष साळवे, अनिस पठाण आदी यावेळी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments