Type Here to Get Search Results !

नगरदेवळा : अंगणवाडी शेजारी ‘डीपी’चा प्रस्ताव!

* लहान मुलांच्या जीवाशी खेळ ? सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप  

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा येथे एका अंगणवाडी शेजारी तसेच नदीपात्रातील खडकावर महावितरणकडून वीज वितरण ट्रान्सफॉर्मर (डीपी) उभारण्याची हालचाल सुरू असल्याची माहिती समोर येताच ग्रामस्थ व स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. लहान मुलांचे शिक्षण, खेळ आणि नागरिकांची वर्दळ असलेल्या या ठिकाणी डीपी उभारण्याच्या प्रस्तावामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

नगरदेवळ्यातील अंगणवाडी शेजारी डीपी उभारण्याचा प्रस्ताव हा केवळ विकासाचा प्रश्न नसून लहान मुलांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर मुद्दा आहे. नियम, सुरक्षा आणि नागरिकांच्या भावना यांचा विचार न करता घेतलेले निर्णय भविष्यात मोठे संकट ओढवू शकतात, हे अनेकदा दिसून आले आहे. 


* अंगणवाडी परिसरातच डीपी :- या ठिकाणी अंगणवाडी असल्याने रोज लहान मुले येथे ये-जा करतात. सकाळ - संध्याकाळ मुले खेळत असतात, नागरिकांची सततची वर्दळ असते, बाजाराच्या दिवशी मोठी गर्दी अशा परिस्थितीत अंगणवाडीपासून 100 ते 500 मीटर परिसरात डीपी उभारण्याचा प्रस्ताव असल्याने पालक, स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. उद्या एखादा अपघात झाला तर जबाबदार कोण ? असा थेट सवाल नागरिक करीत आहेत.


* नदीपात्रात डीपी ? पूर काळात जीविताला धोका :- ही जागा नदीपात्राशी संबंधित असल्याने पावसाळ्यात पूर येण्याची शक्यता असते. जर डीपी पाण्याखाली गेले तर विजेचा करंट पाण्यात पसरण्याचा धोका राहणार आहे. नागरिक, जनावरे आणि मुलांच्या जीवाला गंभीर संकट होवू शकते यामुळे या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


* परवानग्या आणि ‘एनओसी’वरही संशय :- या निर्णयावर ग्रामस्थांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ग्रामपंचायतीने योग्य ठराव केला आहे का ? महावितरणने सर्व कायदेशीर परवानग्या घेतल्या आहेत का ? एनओसी कोणत्या अधिकाऱ्यांनी दिली? संबंधितांनी अपघाताची जबाबदारी स्विकारण्याची लेखी हमी देणार का ? या सर्व मुद्द्यांवर प्रशासन मौन बाळगत असल्याने संशय अधिक गडद झाला आहे.


* महावितरणचे सुरक्षा नियम काय सांगतात ? :- तांत्रिक मानदंडांनुसार वीज वितरण ट्रान्सफॉर्मर बसवतांना 

- स्थान निवड (Site Selection) :- शाळा, अंगणवाडी, रुग्णालय, गर्दीची ठिकाणे यापासून सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे. नदीपात्र, पूरप्रवण क्षेत्र टाळणे आवश्यक आहे. 

- सुरक्षित अंतर (Clearance Norms) :- सार्वजनिक ठिकाणांपासून किमान सुरक्षित अंतर राखणे (साधारण 3 ते 5 मीटर किंवा अधिक, परिस्थितीनुसार) मुलांच्या सहज पोहोचेत नसावे. 

- संरक्षण व्यवस्था (Safety Measures) :- डीपीभोवती मजबूत कुंपण / कंपाउंड आवश्यक असून लॉकिंग सिस्टम, अर्थिंग (Earthing) आणि लाईटनिंग प्रोटेक्शन हवे. ‘धोकादायक - विजेचा धोका’ अशा सूचना फलक लावणे आवश्यक आहे. 

- देखभाल व निरीक्षण :- नियमित तपासणी, झाडेझुडपे, उघडी वायर, उघडे झाकण यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, असे निर्देश आहेत. 


* अंगणवाडी शेजारी डीपी उभारता येते का ? :- अंगणवाडी शेजारी डीपी उभारण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या काही विशेष परिस्थितीत परवानगी मिळू शकते, पण बालकांची सुरक्षा धोक्यात येणार नाही याची खात्री करणे बंधनकारक आहे. सुरक्षित अंतर, कुंपण, संरक्षक भिंती अनिवार्य आहे. स्थानिक प्रशासन व संबंधित विभागांची स्पष्ट परवानगी आवश्यक आहे. मात्र, नगरदेवळ्यातील प्रस्तावित जागा पाहता हे सर्व नियम पाळले गेले आहेत का, यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे.


* दडपशाहीने काम रेटले जात आहे ? :- सूत्रांच्या माहितीनुसार काही माजी लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली हे काम पुढे नेले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विरोध केल्यास पोलिस कारवाईची धमकी दिल्याचेही समोर आले आहे. ग्राम पंचायत, महावितरण, पंचायत समिती व पोलिस प्रशासन तसेच गावातील सर्वच राजकीय पक्षांनी अंगणवाडी शेजारी होत असलेल्या डिपीबाबत त्यांची भुमिका स्पष्ट करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. संबधित माजी लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या डिपीला कुणाचा कुणाचा पाठींबा आहे ? डिपी झाल्यानंतर होणाऱ्या अपघाताची जबाबदारी घेण्याची कुणाकुणाची तयारी आहे ? हे जाहीर करण्यात यावे, अशी मागणी देखील होत आहे.


* इतर डीपींचीही धोकादायक अवस्था उघड :- आखतवाडे रोड येथील रोशन नगर, हसन नगर व वाघ नगर यांच्या मध्यावर असलेली डिपीचे झाकण मागील अनेक दिवसांपासून उघडे आहे. तसेच डिपी शेजारी झाडेझुडपे वाढली आहेत. येथे कोणतीही सुरक्षा नाही, यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून महावितरणच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत. उद्या एखादी लहान बालक खेळता खेळता या उघड्या डिपी जवळ गेले किंवा वाढलेल्या झाडांची पाने खाण्यासाठी एखादी जनावर गेले आणि त्यांचा डिपीला धक्का लागला व शॉक लागून अपघात झाला तर त्याची जबाबदारी कुणाची ? वीज बील वसुलीसाठी घरोघरी जाणाऱ्या महावितरणच्या वायरमन, अधिकारी व कर्मचारी यांना ही उघडी डिपी दिसत नाही का ? नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी महावितरण वायरमन, अधिकारी व कर्मचारी यांची नाही का ? या डिपीचे झाकण लावण्यासाठी वेळ मिळाला नाही का ? वरिष्ठ अधिकारी फक्त कार्यालयात बसून अपघाताची वाट पाहत आहेत का ? की अपघात झाल्यावरच महावितरण जागे होणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे. 


* प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी :- स्थानिक नागरिक व ग्रामस्थांनी स्पष्टपणे मागणी केली आहे की, डीपी उभारणीचा निर्णय तातडीने थांबवावा, सुरक्षित पर्यायी जागा निश्चित करावी, सर्व कागदपत्रे सार्वजनिक करावीत, संबंधित माजी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्विकारावी, तशी लेखी हमी स्थानिक रहिवासी व अंगणवाडीतील आईवडील यांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी ग्राम पंचायत, महावितरण व माजी लोकप्रतिनिधी यांनी डिपी उभारण्याबाबत हुकुमशाही केल्यास नगरदेवळा बाजारपेठेत आमरण उपोषण केले जाईल व याची संपूर्ण जबाबदारी ग्राम पंचायत, महावितरण व माजी लोकप्रतिनिधी यांची असेल, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आता प्रशासन आणि महावितरण यांची भूमिका काय असणार, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement