* नागरिकांची नगराध्यक्षांकडे तातडीची मागणी
* घनकचरा वाहतूक व अवजड वाहनांमुळे रस्ता खड्डेमय
* नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांची लवकरात लवकर काम करण्याची ग्वाही
खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोलीतील मिळगाव परिसरातील वनविभागाच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांनी खोपोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांची भेट घेऊन तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली. सदर रस्ता हा शहरातील महत्त्वाचा मार्ग असून या मार्गांवरून मोठ्या प्रमाणात घनकचऱ्याची वाहतूक केली जाते. यासोबतच परिसरातील दगड खदाणीमुळे अवजड वाहनांची सतत वर्दळ असल्याने रस्त्यांची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. परिणामी रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला असून वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांनी ही गंभीर बाब नगराध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी तत्काळ दखल घेत संबंधित पालिका प्रशासन अधिकारी तसेच वनविभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. रस्त्याच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर करून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त केला जाईल, अशी शाश्वती त्यांनी दिली. या सकारात्मक भूमिकेबद्दल उपस्थित नागरिकांनी नगराध्यक्षांचे आभार व्यक्त केले असून लवकरच प्रत्यक्षात काम सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
यावेळी गौतम शेवाळे, वैभव पाटील, कैलास शेवाळे, अशोक कोरे, ज्ञानेश्वर पाटील, आनिष शेवाळे, नाना शेवाळे, सुनिल अडाणी, ओम शेवाळे, गुडे भाऊ, शिंदे भाऊ आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते. या मागणीसाठी शिवसेना मिळ विभागप्रमुख सचिन गुरसळ यांनी पुढाकार घेतला होता. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेता हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.


Post a Comment
0 Comments