* 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, 12 तासांत 5 आरोपी जेरबंद
* निर्जन जंगलात मित्रासमोर अमानुष कृत्य, व्हिडिओ बनवून धमकी
* पोलिसांची झपाट्याने कारवाई, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
अमरावती / प्रतिनिधी :- अमरावती शहरालगतच्या भानखेडा फाटा परिसरात घडलेल्या एका संतापजनक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर पाच आरोपींनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून पोलिसांनी अवघ्या 12 तासांत सर्व आरोपींना अटक करीत तत्पर कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 28 मार्च रोजी रात्री सुमारे 8 वाजता पीडित तरुणी तिच्या मित्रासोबत दुचाकीवरून घरी परतत होती. यावेळी भानखेडा फाट्याजवळील निर्जन जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांना अडवले. दोघांनाही जबरदस्तीने जंगलात ओढत नेण्यात आले. यानंतर आरोपींनी तरुणाला बेदम मारहाण करत दोरीने बांधून ठेवले आणि त्याच्यासमोरच तरुणीवर अमानुष अत्याचार केला. या पाशवी कृत्यामुळे समाजातील मानवी मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेतील आणखी गंभीर बाब म्हणजे आरोपींनी या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडित तरुणीने स्वतःजवळील पैसे देऊन सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी कोणतीही दया न दाखवता अत्याचार केला.
घटनेनंतर पीडितांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. प्रकरणाची गंभीर दखल घेत अमरावती पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके स्थापन करण्यात आली. पोलिसांनी संपूर्ण रात्र जंगल परिसरात शोधमोहीम राबवली. तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला आणि अवघ्या 12 तासांत सर्व पाच आरोपींना अटक करण्यात यश मिळाले आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कार, मारहाण, धमकी आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
* महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर :- या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शहराच्या बाहेरील निर्जन भागात पुरेशा सुरक्षा उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे. स्थानिक नागरिकांनी या भागात पोलीस गस्त वाढवणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी केली आहे.
* समाजासाठी धोक्याची घंटा :- ही घटना केवळ अमरावतीपुरती मर्यादित नसून संपूर्ण समाजासाठी इशारा आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. राज्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने ठोस आणि कठोर पावले उचलणे अत्यावश्यक असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.


Post a Comment
0 Comments