Type Here to Get Search Results !

नगरदेवळा परिसरातील पानंद रस्त्यांची दुरवस्था

* शेतकऱ्यांचे हाल, तातडीने दुरुस्तीची मागणी

* शेतमाल वाहतुकीत अडथळे ; शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महाजन यांची प्रशासन व आमदारांकडे धाव

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा परिसरातील पानंद (शेत) रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूक करतांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी पाचोरा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नामदेव (नाना) विश्राम महाजन यांनी केली आहे.

नगरदेवळा परिसरातील बहुतांश शेतकरी पानंद रस्त्यांवर अवलंबून आहेत. मात्र, या रस्त्यांवर खड्डे, चिखल आणि असमान पृष्ठभागामुळे शेतमाल वाहून नेणे अत्यंत कठीण झाले आहे. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट होते. वाहनांची हालचाल अडखळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.


नामदेव महाजन यांनी सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शेतमाल वेळेवर बाजारात पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे.”


या प्रश्नाची गंभीरता लक्षात घेता पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्वतः लक्ष घालून संबंधित विभागाला निर्देश द्यावेत, अशी विनंती शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.


शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम करणाऱ्या या समस्येवर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन पानंद रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. योग्य वेळी उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement