* सुशोभिकरण, स्वच्छता व सुरक्षेसाठी तातडीचे निर्देश ; वारसा जतनासाठी प्रशासन सज्ज
विरार / प्रतिनिधी :- नालासोपारा पश्चिम परिसरातील ऐतिहासिक व सामाजिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांच्या जतन आणि विकासासाठी वसई - विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांनी विशेष पाहणी दौरा केला. या दौऱ्यात विविध ठिकाणांची पाहणी करून स्वच्छता, सुरक्षा आणि सुशोभिकरणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट व तातडीचे निर्देश देण्यात आले.
दौऱ्याची सुरुवात महामानव डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. येथे परिसरातील स्वच्छता, प्रकाशयोजना आणि सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेत महापौरांनी आवश्यक त्या सुधारणा तात्काळ करण्याचे आदेश दिले. यावेळी बोलतांना त्यांनी, “डॉं. आंबेडकरांनी दिलेली समानता आणि न्यायाची मूल्ये समाजासाठी आजही मार्गदर्शक आहेत. त्यांच्या स्मारकांची देखभाल ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे नमूद केले.
यानंतर महापौरांनी गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याची पाहणी केली. शांतता, करुणा आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या या स्थळाचे महत्त्व अधोरेखित करीत त्यांनी परिसर स्वच्छ आणि आकर्षक ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता मोहिमा राबवण्याचे निर्देश दिले.
दौऱ्याचा पुढील टप्पा म्हणजे सामाजिक एकतेचे प्रतीक असलेली पंचशील कमान. महापौरांनी कमानीची संरचना तपासून तिच्या तातडीच्या दुरुस्ती व देखभालीचे आदेश दिले. तसेच या परिसरात सुशोभिकरण, विद्युत रोषणाई आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यावर विशेष भर देण्यात आला.
या पाहणी दौऱ्यात माजी महापौर रूपेश जाधव, स्थानिक नगरसेवक परेश किणी, नगरसेविका ॲंड. दीप्ती भोईर, माजी नगरसेवक नरेश जाधव तसेच इतर मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.


Post a Comment
0 Comments