* भक्तीमय वातावरण, रोषणाई आणि जत्रेच्या उत्साहात शहर रंगले ; नवस पूर्ण करण्यासाठी भाविकांची गर्दी
अहिल्यानगर / प्रा. ज्ञानेश्वर बनसोडे :- अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथे ग्रामदैवत श्री वीरभद्र महाराज यांच्या यात्रोत्सवाला यंदा मोठा उत्साह लाभला असून भाविकांचा अक्षरशः महापूर उसळला आहे. यात्रेमुळे संपूर्ण शहरात भक्ती, आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री वीरभद्र महाराज आणि नवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त परिसरातील हजारो भाविकांनी राहता येथे गर्दी केली आहे. आपले नवस पूर्ण करण्यासाठी नागरिक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येत असल्याचे चित्र दिसत आहे.
यात्रेनिमित्त रहाट पाळणे, विविध खेळणी, खाद्यपदार्थांची दुकाने यामुळे जत्रेला रंगतदार स्वरूप प्राप्त झाले आहे. बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक जत्रेचा आनंद घेताना दिसत आहेत. नागरिक पाळण्यात बसण्याचा आनंद लुटत असून विविध खाद्यपदार्थांवर ताव मारतांना उत्साह दिसून येत आहे.
यात्रेनिमित्त शहरात भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली असून नागरिकांनी घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढून यात्रोत्सवात सहभाग नोंदविला आहे. यामुळे संपूर्ण शहराला एक वेगळेच उत्सवी रूप प्राप्त झाले आहे.
वीरभद्र मंदिर देवालय उत्सव ट्रस्टचे अध्यक्ष जबाजी मेचे, उपाध्यक्ष विजय सदाफळ आणि विश्वस्त मंडळी यांनी यात्रेचे सुयोग्य नियोजन केले आहे. यात्रेदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर, मुख्याधिकारी वैभव लोंढे आणि स्थानिक प्रशासनाने यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.
यात्रेमुळे स्थानिक व्यावसायिकांनाही मोठा फायदा होत असून शहरात सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा संगम असलेली ही यात्रा राहता शहराच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनली आहे.


Post a Comment
0 Comments