Type Here to Get Search Results !

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सदिच्छा भेट

* नवबौद्धांच्या जनगणनेबाबत महत्त्वाची मागणी

* धर्मांतरीत बौद्धांची अनुसूचित जातीमध्ये नोंद करण्याबाबत राज्यपालांकडे निवेदन

* झोपडपट्टी पुनर्वसन, पदोन्नतीतील आरक्षण व भूमिहीनांच्या प्रश्नांवरही चर्चा

मुंबई / प्रतिनिधी :- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची मुंबईतील लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीत विविध सामाजिक, आर्थिक व धोरणात्मक विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी ना. आठवले यांनी देशात सुरू होणाऱ्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मागणी मांडली. अनुसूचित जातीमधून बौद्ध धर्म स्विकारलेल्या नागरिकांची जनगणना करतांना धर्माच्या रकान्यात “बौद्ध” आणि जातीच्या रकान्यात “अनुसूचित जात” अशी नोंद करावी, तसेच संबंधित जातीचा अनुक्रमांक नमूद करावा, अशी सूचना त्यांनी राज्यपालांकडे केली. यामुळे महाराष्ट्रातील नवबौद्धांची लोकसंख्या अनुसूचित जातीमध्ये योग्य प्रकारे नोंदवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 14 ऑक्टोबर 1956 रोजी मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जातीतील लोकांनी बौद्ध धर्म स्विकारला. त्यानंतर 1990 मध्ये घटनादुरुस्ती करून नवबौद्धांचा अनुसूचित जातींमध्ये समावेश करण्यात आला. मात्र, जनगणनेत योग्य नोंद न झाल्यास या समाजाची लोकसंख्या कमी दर्शविली जाण्याची शक्यता असल्याचे आठवले यांनी नमूद केले.


झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत सध्या मिळणाऱ्या 300 चौरस फूट घरांच्या ऐवजी किमान 500 चौरस फूट घर देण्याची मागणीही त्यांनी राज्यपालांकडे केली. यामुळे झोपडीवासीयांच्या जीवनमानात सुधारणा होईल, असे त्यांनी सांगितले. सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीत आरक्षण लागू करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात परवानगी दिली असून इतर राज्यांमध्येही ही तरतूद लागू आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही पदोन्नतीतील आरक्षण लागू करावे, अशी मागणी त्यांनी केली.


राज्यातील भूमिहीन नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधतांना त्यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी 1990 च्या शासन निर्णयाची कालमर्यादा 2000 पर्यंत वाढवावी, अशी मागणी केली. तसेच दलित व मागासवर्गीय भूमिहीनांना शेतीयोग्य जमीन उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी नमूद केले.


या भेटीदरम्यान रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, युवक आघाडीचे अध्यक्ष पप्पू कागदे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement