Type Here to Get Search Results !

बंगाल ममतादीदीमुळे झाला कंगाल - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

कोलकाता - मुंबई / प्रतिनिधी :- मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच्या काळात पश्चिम बंगालचा विकास होवू शकला नाही. पश्चिम बंगालमधील मागासवर्गीयांना सामाजिक, आर्थिक न्याय मिळालेला नाही. ममतादीदींच्या काळात पश्चिम बंगालमध्ये गुंडाराज वाढलेले आहे. त्यामुळे या निवडणुकीत ममता बॅनर्जींची सुट्टी होणार आणि भाजपच्या सत्तेची शिट्टी वाजणार आहे. पश्चिम बंगाल ममतादीदीमुळे झाला आहे कंगाल, अशी घाणाघाती टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा असल्याचे ना. रामदास आठवले यांनी आज कोलकाता येथे जाहीर केले.  

पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या सर्व 294 जागांवर रिपब्लिकन पक्षाने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. रिपब्लिकन पक्ष पश्चिम बंगालमध्ये एकही जागा लढविणार नसून सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा राहील. पश्चिम बंगालमधील तृणमृल कॉंग्रेसचे गुंडाराज उलथवून टाकण्यासाठी भाजपला पूर्ण ताकदीने पाठिंबा देण्याची गरज असल्याने रिपब्लिकन पक्षाने पश्चिम बंगालमध्ये एकही जागा न लढता सर्व जागांवर भाजपला पाठिंबा दिलेला आहे. पश्चिम बंगालमधील सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवारांना विजयी करण्यासाठी ताकदीने प्रचार करण्याचे आवाहन ना. आठवले यांनी कोलकाता येथे केले. कोलकाता येथे भाजप उमेदवारांच्या प्रचार रॅलीत ना. रामदास आठवले बोलत होते. यावेळी भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेश अध्यक्ष सामीक भट्टाचार्य उपस्थित होते.  


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभर विकासाचे वादळ वाहत आहे. देशभरातील 80 कोटी गरीबांना मोफत अन्नधान्य देण्यापासुन अनेक जनहिताच्या योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सुरु आहेत. पश्चिम बंगालचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजप जनतेची पसंती ठरणार आहे. ममतादीदी आणि तृणमृलच्या गुंडाराजमुळे येथील जनता  त्रस्त असून मत पेटीतून तृणमृल सरकारला जनता उद्ध्वस्त करणार आहे. भाजपला येथे विक्रमी बहुमत मिळणार असल्याचा दावा ना. आठवले यांनी केला आहे.  

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement