Type Here to Get Search Results !

एपीआय कल्याणी वर्मा यांच्या समर्थनार्थ महिलांचा निर्धार

* अन्याय झाला तर रस्त्यावर उतरू...अवैध धंद्यांवर कारवाईनंतर परिसरात शांतता ; वर्मा मॅडमविरोधातील हालचालींवर नागरिक आक्रमक

पाचोरा / प्रतिनिधी :- पिंपळगाव हरेश्वर परिसरात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) कल्याणी वर्मा यांच्या समर्थनार्थ महिला, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते एकवटले आहेत. “ज्यांनी आमचे संसार वाचवले, त्यांच्यावर अन्याय सहन करणार नाही,” असा ठाम इशारा देत महिलांनी गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे.

काही महिन्यांपूर्वीपर्यंत पिंपळगाव हरेश्वर परिसरात सट्टा, पत्ता जुगार, गावठी व रासायनिक दारू विक्री यांसारख्या बेकायदेशीर धंद्यांनी अक्षरशः थैमान घातले होते. यामुळे कुटुंबांमध्ये वाद, आर्थिक संकट आणि व्यसनाधीनतेची समस्या वाढली होती. विशेषतः महिलांना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. API कल्याणी वर्मा यांनी पदभार स्विकारताच तक्रारींची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई सुरू केली. त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव हरेश्वर, वरखेडी, लोहारा, शिरसाड, कुन्हाड खुर्द, अंबे वडगांव आणि सातगाव डोंगरी या गावांमध्ये सलग छापेमारी करण्यात आली. अवैध दारू विक्री केंद्रे उद्ध्वस्त करण्यात आली, रासायनिक दारू निर्मितीवर कारवाई, या मोहिमेमुळे जवळपास 90% अवैध व्यवहार बंद झाल्याची माहिती समोर येत आहे.


या कारवाईनंतर परिसरात मोठा बदल जाणवू लागला आहे. रात्रीच्या संशयास्पद हालचाली थांबल्या आहेत, महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली आहे, कुटुंबातील वातावरण सुधारले आहे, यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या कार्याबद्दल वरखेडी गावातील महिला बचत गटांनी पोलीस स्टेशनला भेट देत वर्मा यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच ममता राहुल पाटील, सचिव रेखाताई कैलास पाटील, लिपिका रुपाली सागर धनगर, सदस्य सपना गणेश सोनवणे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.


दरम्यान, वर्मा यांच्या कारवाईमुळे अवैध धंद्यांना आळा बसल्याने काही घटक अस्वस्थ झाले असून त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढला असून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे शिष्टमंडळ नेण्याची तयारी असून पोलीस स्टेशनमधील अंतर्गत बाबींची चौकशी मागणी, “मासिक पाकीट” प्रकरणावर निष्पक्ष तपासाची मागणी यासारख्या हालचाली सुरू झाल्या आहेत.


महिलांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, वर्मा मॅडमवर अन्याय झाला तर आम्ही रस्त्यावर उतरू” त्यांच्या या भूमिकेमुळे संपूर्ण परिसरात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना API कल्याणी वर्मा यांनी सांगितले की, “कायदा व सुव्यवस्था राखणे हे आमचे कर्तव्य आहे. नागरिकांचा विश्वास आणि सहकार्य हेच आमचे बळ आहे.


पिंपळगाव हरेश्वर परिसरातील ही घटना केवळ एका अधिकाऱ्याच्या कामगिरीपुरती मर्यादित नसून नागरिक आणि प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नातून घडलेला सकारात्मक बदल आहे. आज परिसरात निर्माण झालेली शांतता ही महिलांच्या धैर्याची आणि प्रशासनाच्या ठाम भूमिकेची साक्ष देणारी ठरली आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement