* पळस्पे येथे मोठी तोडक कारवाई
* होर्डिंग्जधारकाविरुद्ध गुन्हा दाखल
* आत्महत्येची धमकी देत कारवाईत अडथळा
नवी मुंबई / दशरथ कांबळे :- वादळी वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोके लक्षात घेऊन सिडकोच्या नैना विभागाने अनधिकृत होर्डिंग्जविरोधात कठोर मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत पनवेल तालुक्यातील पळस्पे (सर्व्हे क्र. 92) येथे उभारण्यात आलेले विनापरवानगी अवाढव्य जाहिरात फलक हटविण्यात आले.
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गालगत उभारण्यात आलेला हा जाहिरात फलक सिडकोच्या कोणत्याही परवानगीशिवाय उभारण्यात आला होता. त्यामुळे सिडकोच्या अनधिकृत बांधकामे (नैना) विभागामार्फत 15 एप्रिल 2026 रोजी निष्कासन मोहीम राबवून तोडक कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान संबंधित होर्डिंग्जधारकाने तीव्र विरोध दर्शवित, थेट फलकावर चढून आत्महत्येची धमकी दिली. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. यावेळी अग्निशमन दल व पोलिसांच्या मदतीने संबंधित इसमाला समज देत सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले. या प्रकारामुळे कारवाईत अडथळा निर्माण झाला.
या घटनेनंतर संबंधित होर्डिंग्जधारकाविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणणे व आत्महत्येचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मोहीम मुख्य दक्षता अधिकारी तथा पोलीस उपमहानिरीक्षक सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार आणि मुख्य नियंत्रक (अनधिकृत बांधकामे - नैना) प्रशांत भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सिडको अतिक्रमण विभाग, स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, महावितरण विभाग, सिडको सुरक्षा रक्षक व महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या पथकांचा सहभाग होता.
या कारवाईसाठी खालील यंत्रसामग्री व मनुष्यबळ वापरण्यात आले. 1 सुपरवायझर, 10 मजूर, 1 JCB, 1 क्रेन, 1 ट्रक, 5 जीप होते. सिडकोच्या प्रचलित नियमावलीचा भंग करून उभारण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंग्जविरोधात पुढील काळातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.


Post a Comment
0 Comments