Type Here to Get Search Results !

दूरदृष्टी, नेतृत्व आणि जनसेवेचा प्रवास : यशवंतशेठ साबळे यांची प्रभावी ओळख

* उद्योग, शिक्षण आणि राजकारणाचा त्रिवेणी संगम

* खोपोलीच्या विकासगाथेतील एक ठसा उमटविणारे नेतृत्व

खोपोलीच्या सामाजिक, औद्योगिक आणि राजकीय जीवनात आपली ठळक छाप उमटविणारे यशवंत लक्ष्मणशेठ साबळे हे केवळ एक उद्योजक किंवा राजकीय व्यक्तिमत्व नसून दूरदृष्टी, जिद्द आणि समाजसेवेचा संगम असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्याचा प्रवास हा सामान्य कुटुंबातून उभा राहून असामान्य उंची गाठण्याचा प्रेरणादायी आदर्श आहे.

यशवंतशेठ यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबीयांची समृद्ध सामाजिक व राजकीय परंपरा ठामपणे उभी आहे. वडिलांनी नगराध्यक्ष पद भूषवून जनतेचा विश्वास जिंकला, तर भाऊ तुकाराम शेठ साबळे यांनी नगरसेवक ते सभापती म्हणून शहराच्या विकासात मोलाची भूमिका बजावली. त्याचप्रमाणे पुष्पा तुकाराम साबळे यांनी नगरसेविका ते उपनगराध्यक्ष म्हणून प्रभावी कामगिरी करीत सामाजिक बांधिलकी जपली. या वारशातूनच यशवंतशेठ यांना नेतृत्वाची दिशा मिळाली.


उद्योजक म्हणून यशवंतशेठ साबळे यांनी व्यवसाय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले उद्योग हे केवळ नफ्यापुरते मर्यादित नसून, स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणारे ठरले आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीतून आर्थिक प्रगतीसोबतच सामाजिक समतोल साधण्याचा स्पष्ट दृष्टिकोन दिसून येतो.


शिक्षण हेच समाजाच्या विकासाचे मूळ मानत यशवंतशेठ यांनी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक म्हणून अनेक उपक्रम राबवले. ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले आहेत.


राजकीय क्षेत्रात यशवंतशेठ यांची भूमिका अत्यंत प्रभावी राहिली आहे. त्यांनी थेट पद न भूषवता पडद्यामागून नेतृत्व घडविण्याचे काम केले आहे. “किंग मेकर” म्हणून ओळख निर्माण करीत त्यांनी अनेकांना योग्य दिशा दिली. त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे आणि जनसंपर्कामुळे ते राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचे स्थान राखून आहेत.


यशवंतशेठ यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत त्यांचे सुपुत्र विक्रम साबळे यांनीही समाजकारणात सक्रिय भूमिका घेतली आहे. विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत त्यांनी जनतेशी नाळ जुळवली आहे. खोपोली नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येत सध्या उपनगराध्यक्ष पदावर कार्यरत राहून त्यांनीही सक्षम नेतृत्वाची परंपरा पुढे नेली आहे.


यशवंतशेठ साबळे यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे दृढ निश्चय, व्यवस्थापन कौशल्य आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यांचा सुंदर मिलाफ होय. त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे की, यश केवळ वैयक्तिक नसून ते समाजाच्या प्रगतीशी जोडलेले असावे.

- दिनकर भुजबळ (समता सैनिक, खोपोली - रायगड)

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement