* खालापूरमध्ये भोंदू बाबाचे संतापजनक कृत्य, काळी जादू उतरविण्याचे आमिष
* अघोरी पूजेच्या नावाखाली अत्याचार, आरोपी अटकेत
खोपोली / मानसी कांबळे :- संपूर्ण महाराष्ट्राला सध्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने चांगलेच हादरवले आहे. अंकशास्र व भविष्य पाहण्याच्या बहाण्याने अनेक महिलांचा खरातने शारीरिक व मानसिक छळ केला आहे. दरम्यान, अशीच एक धक्कादायक व संतापजनक घटना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातून समोर आली आहे. जादूटोणा उतरविण्याच्या बहाण्याने या भोंदू बाबाने 23 वर्षीय महिलेला फसवून तिच्यावर अत्याचार केला असून तक्रारीनंतर खालापूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत आरोपीला अटक केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कौटुंबिक समस्यांमुळे मानसिक तणावात होती. याच दरम्यान तिची ओळख अब्दुर रशीद उर्फ बाबाजान (वय 40, रा. कळंबोली, नवी मुंबई) याच्याशी झाली. आरोपीने तिच्या परिस्थितीचा फायदा घेत, “तुझ्यावर काळी जादू करण्यात आली आहे,” अशी भीती दाखवत तिचा विश्वास संपादन केला.
डिसेंबर 2024 मध्ये आरोपीने पीडितेला खालापूर येथील एका ठिकाणी बोलावून घेतले. मध्यरात्री 1 ते पहाटे 5:30 दरम्यान अघोरी पूजा आणि जादूटोणा उतरविण्याच्या नावाखाली आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. घटनेनंतर “कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील” अशी धमकीही आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दीर्घकाळ भीतीत राहिल्यानंतर पीडितेने धैर्य दाखवत खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS-2023) कलम 64, 74, 115(2), 351(2) व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा 2013 (कलम 3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन सदाशिव पवार करीत असून अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. या घटनेमुळे समाजात अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या गुन्ह्यांचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचविण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे आणि संशयास्पद बाबींविषयी त्वरित पोलिसांना माहिती देणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


Post a Comment
0 Comments