* 11 जणांचा मृत्यू, अनेक जखमी : प्रवासी व्हॅन व सिमेंट मिक्सरची समोरासमोर जोरदार धडक
* व्हॅनचा चक्काचूर ; मृतांचा आकडा वाढण्याची भीती, रस्त्याचे काम व अतिवेगामुळे अपघाताची शक्यता
ठाणे / खलील सुर्वे :- ठाणे जिल्ह्यातील कल्याण - मुरबाड महामार्गांवर रायते गावाजवळील उल्हास नदीवरील पुलावर आज (13 एप्रिल 2026) सकाळी भीषण अपघात झाला. प्रवासी वाहतूक करणारी इको व्हॅन आणि सिमेंट मिक्सर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. धडक इतकी भीषण होती की व्हॅनचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताच्या वेळी वाहनांत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे.
सुरुवातीला या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र नंतर मृतांचा आकडा वाढून 11 वर पोहोचला, ज्यामध्ये 8 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. सर्व मृतदेह गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले असून त्यापैकी 9 जणांची ओळख पटली आहे. उर्वरित दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
प्रशांत उर्फ बबलू रुपेश चंदने (वय 21, देवगाव, मुरबाड), भूषण घोरपडे (वय 49, अंधेरी, मुंबई - महसूल सहाय्यक), जिजा गोविंदा केंबारी (वय 50, टेंभरे, मुरबाड), अनंता पवार (साखरे, मुरबाड), दीपक गवळी (कल्याण), गणपत जैनू मधे (वय 32, देवराळवाडी, मुरबाड), स्नेहा मोहपे (वय अंदाजे 22, नारायणगाव, मुरबाड), मानसी मोहपे (वय अंदाजे 20, नारायणगाव, मुरबाड), प्रथमेश मोहपे (वय अंदाजे 17, नारायणगाव, मुरबाड) अशी मृतांची नावे आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस व हेल्प फाउंडेशनच्या जीवरक्षक दल (शहापूर) यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक अंदाजानुसार, पुलावर सुरू असलेले रस्त्याचे काम, वाहनांचा अतिवेग तसेच वाहनातील जास्त प्रवासी या कारणांमुळे अपघात घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


Post a Comment
0 Comments