* रस्त्यावर पार्किंगमुळे वाहतूक ठप्प : पार्किंग यार्ड अपुरे ; ट्रक-ट्रेलर रस्त्यावरच उभे
* रस्ते सुरक्षा नियमांचे उल्लंघन ; अपघाताचा वाढता धोका
* प्रशासनाच्या ठोस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
खालापूर / साबीर शेख :- खालापूर तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत टाटा स्टील कंपनीसमोर अवजड वाहनांच्या पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनीत येणाऱ्या ट्रक व ट्रेलर चालकांनी थेट रस्त्यावरच वाहन उभी केल्याने सावरोली - खारपाडा मार्गांवरील वाहतूक विस्कळीत होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, कंपनी परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये-जा करतात. मात्र, पार्किंग यार्ड अपुरे असल्याने ही वाहने रस्त्यावरच उभी राहतात. परिणामी, रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रक-ट्रेलरमुळे अपघाताचा धोका वाढला असून रस्ते सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. उद्योग समूहांकडूनच अशा प्रकारे नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात चौकशी केली असता कंपनीचे संबंधित अधिकारी, सुरक्षा कर्मचारी किंवा पार्किंग नियोजन करणारे प्रतिनिधी घटनास्थळी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर तक्रार नोंदविल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होतांना दिसली नाही. काही ट्रक व ट्रेलर चालकांनी “आम्ही नेहमीच येथेच वाहन उभी करतो” अशी प्रतिक्रिया देत नियमांकडे दुर्लक्ष सुरूच ठेवले आहे. यामुळे बेकायदेशीर पार्किंगचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे.
या समस्येकडे वाहतूक पोलिस, ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. रस्त्यावर सुरू असलेले बेकायदेशीर पार्किंग त्वरित थांबवून सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुनिश्चित करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Post a Comment
0 Comments