* 96 कोटींच्या मलनिस्सारण योजनेतील कथित गैरप्रकारांविरोधात नागरिक आक्रमक
* प्रशासकीय विसंगती, तांत्रिक त्रुटी आणि पारदर्शकतेच्या अभावाविरोधात आंदोलनाची हाक
खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली नगर परिषदेमार्फत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या सुमारे 96.13 कोटी रुपये खर्चाच्या मलनिस्सारण (Sewerage) योजनेतील कथित अनियमितता, तांत्रिक त्रुटी आणि प्रशासकीय विसंगतींविरोधात 2 जून 2026 रोजी खोपोली नगर परिषद कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
नगर परिषदेचे पत्र क्रमांक 596, 8 मे 2026 तसेच अंतर्गत चौकशी अहवालाचा दाखला देत आंदोलनकर्त्यांनी या प्रकल्पाच्या निर्णयप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रकल्पामध्ये प्रशासकीय घोटाळा, तांत्रिक नियमांचे उल्लंघन आणि कंत्राटदाराला नियमबाह्य सवलती दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, नागरिकांना लेखी स्वरूपात देण्यात आलेल्या आश्वासनांचा भंग करण्यात आला असून, कामाच्या अंमलबजावणीत अनेक गंभीर त्रुटी आढळून येत आहेत. शहरातील विविध भागांमध्ये रस्ते खोदून ठेवणे, कामातील विलंब, नागरिकांना होणारा त्रास आणि नियोजनशून्य कारभार यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर लोकशाही मार्गाने निषेध नोंदविण्यासाठी काळे कपडे परिधान करून शांततापूर्ण धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच प्रकल्पातील सर्व आर्थिक आणि तांत्रिक बाबी सार्वजनिक कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे खोपोली नगर परिषद प्रशासनासमोर नवे आव्हान उभे ठाकले असून, नागरिकांच्या प्रश्नांवर प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


Social Plugin