Type Here to Get Search Results !

टोळक्याकडून गोळ्या घालून दोन भावांची हत्या

* उल्हासनगरात थरार, हप्तेखोरीविरोधात तक्रार करणे जिवावर बेतले

उल्हासनगर / सलीम मन्सुरी :- उल्हासनगर शहरात पुन्हा एकदा गुंडगिरी आणि हप्तेखोरीचा रक्तरंजित चेहरा समोर आला असून कॅम्प नंबर 5 मधील कैलाश कॉलनी परिसरात भररस्त्यात झालेल्या गोळीबारात दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने शहर हादरले आहे. हप्तेखोरी आणि दादागिरीला विरोध केल्याचा राग मनात धरून 15 ते 16 जणांच्या सशस्त्र टोळक्याने हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या थरारक घटनेत अनिल हरकेश चौहान आणि अमन हरकेश चौहान या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला असून अर्जुन सुरजबली चौहान हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


* सायंकाळी कैलाश कॉलनीत दहशत :- मिळालेल्या माहितीनुसार, कैलाश कॉलनी चौकात सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अचानक काही जण हातात तलवारी, दांडके आणि पिस्तुले घेऊन आले. परिसरातील नागरिक काही समजून घेण्याआधीच टोळक्याने अंदाधुंद गोळीबार सुरू केला.


प्रत्यक्षदर्शींच्या मते, आरोपींनी तब्बल दहा राउंड फायरिंग केली. गोळ्यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला. नागरिकांमध्ये एकच पळापळ उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चौहान बंधूंना पाहून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.


* तडीपार गुंडासह अनेकांवर आरोप :- मृतांच्या नातेवाईकांनी बलवीर बिराजदार, शेखर बिराजदार, अजय राव, अजित शेख, देवेंद्र नाईक, तडीपार गुंड सागर लक्ष्मण पाटील आणि त्यांच्या साथीदारांवर थेट आरोप केले आहेत. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. 


माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉंक्टरांनी अनिल आणि अमन चौहान यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी अर्जुन चौहान याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.


* हप्तेखोरीच्या वादातून वाढला संघर्ष :- या हत्येमागे जुना वाद आणि हप्तेखोरीचे कारण असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी टेम्पो पार्किंग आणि हप्तेखोरीच्या वादातून परिसरात तणाव निर्माण झाला होता. पंधरा दिवसांपूर्वी हप्ता न दिल्याने एका टेम्पो चालकावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा ही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अनिल चौहान यांनी बलवीर आणि शेखर बिराजदार यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती.


याचाच राग मनात धरून 28 एप्रिल रोजी आरोपींनी अनिल चौहान यांच्या घरी जाऊन लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तडीपार गुंड सागर पाटील याने किशोर चौहान याला फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती, असेही समोर आले आहे.


* जुन्या वैमनस्यातून रक्तरंजित शेवट ? :- पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी आणि चौहान कुटुंबीयांमध्ये 2020 पासून जुना वाद सुरू होता. संबंधित टोळीवर यापूर्वीही खुनाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या वैमनस्यातूनच हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


* आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके :- या घटनेनंतर पोलिस प्रशासन अलर्ट झाले असून आरोपींना अटक करण्यासाठी चार विशेष तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. या संदर्भात पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की, जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची शक्यता आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके काम करीत असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल.


* उल्हासनगरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर :- भररस्त्यात झालेल्या या दुहेरी हत्येमुळे उल्हासनगरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तडीपार गुंड आणि गुन्हेगार टोळ्यांचा वाढता प्रभाव पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी कठोर कारवाई करून शहरातील गुंडगिरी मोडून काढावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement