Type Here to Get Search Results !

नगरदेवळा ग्रामपंचायत झोपेत...नागरिक मात्र समस्यांच्या विळख्यात!

* अग्नावंती नदीची साफसफाई रखडली, पावसाळ्यापूर्वी पूरस्थितीची भीती

* स्ट्रिट लाईट बंद, रस्ते अंधारात, गटारी तुंबल्या

* ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी आणि विरोधकांवर नागरिकांचा संताप

* "घरपट्टीसाठी दादागिरी…पण लाईट आणि गटारींसाठी वेळ नाही ?” ग्रामस्थांचा थेट सवाल

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा ग्रामपंचायत हद्दीत सध्या समस्यांचे अक्षरशः साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांच्या संयमाचा बांध आता फुटू लागला आहे. गावातील गटारी तुडुंब भरल्या आहेत, अनेक गल्लीतील खांबांवरील स्ट्रीट लाईट बंद पडल्या आहेत, रस्ते खड्डेमय झाले आहेत, तर गावाच्या मध्यातून वाहणारी अग्नावंती नदी गाळाने भरून गेली आहे. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामसेवक, सरपंच, सदस्य आणि विरोधी पक्ष पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दररोज नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असतांना ग्रामपंचायत प्रशासन मात्र घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीतच व्यस्त असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “घरपट्टी वेळेवर नाही भरली तर दंड आणि नोटीस…पण गावात अंधार, घाण आणि खड्डे आहेत याकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाकडे वेळ नाही का ?” असा संतप्त सवाल आता नागरिक उघडपणे विचारू लागले आहेत.

गावातील नागरिकांमध्ये आता उघडपणे चर्चा सुरू झाली आहे की, “गावाचा विकास करण्यापेक्षा निवडणुकीत पैसे वाटून सत्ता काबीज करणे” हीच मानसिकता ग्रामपंचायत चालविणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांची झाली आहे. निवडणुकीत मतांसाठी घराघरांत जाणारे लोकप्रतिनिधी आता नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.

* दरवर्षी पूर, पण प्रशासनाला जाग नाही :- नगरदेवळा गावाच्या मध्यातून वाहणाऱ्या अग्नावंती नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. नदीपात्र गाळाने भरल्यामुळे पाणी थेट बाजारपेठेत शिरते. अनेक दुकाने जलमय होतात, व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते आणि गावाचा संपर्क तुटतो.


विशेष म्हणजे, हा प्रश्न नवीन नाही. दरवर्षी पूर येतो, व्यापारी नुकसान सहन करतात, नागरिक त्रस्त होतात, तरीही नदीची वेळेत साफसफाई केली जात नाही. यामुळे “ग्रामपंचायत प्रशासनाला पूरस्थितीची वाट पाहायची आहे का ?” असा प्रश्न व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.


बाजारपेठेतील व्यापारी सांगतात की, “चार महिने आम्ही भीतीच्या छायेत व्यवसाय करतो. पाऊस आला की दुकान वाचवायचे की व्यापार करायचा ? अशी वेळ येते. पण ग्रामपंचायतीला याचे काहीच सोयरसुतक नाही.”

* गटारी तुडुंब, दुर्गंधीने नागरिक त्रस्त :- गावातील अनेक भागांत गटारी महिनोन्महिने साफ न केल्याने तुडुंब भरल्या आहेत. सांडपाणी रस्त्यावर वाहत असून दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सर्वच वॉर्ड परिसरात कमी-जास्त प्रमाणात अशी परिस्थिती असून बाजारपेठ परिसर आणि अनेक गल्लीबोळांमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. डासांचे प्रमाण वाढल्याने साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  “ग्रामपंचायत साध्या गटारी काढू शकत नसेल तर नागरिकांनी कर कशासाठी भरायचा ?” असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.


* लाखो रुपये वसुली…पण लाईट कुठे ? :- नगरदेवळा गावातील अनेक खांबावर लाईट नसल्याचे दिसून येत आहे. अनेक खांबांवर लाईट बसविण्यात आल्याचा दावा ग्रामपंचायतीकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात बहुतेक दिवे बंद अवस्थेत आहेत. 


नागरिक संतप्तपणे म्हणत आहेत, “घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीतून लाखो रुपये जमा झाले… मग ते पैसे गेले कुठे ? 14 वा आणि 15 वा वित्त आयोगातून आलेला निधी कुठे खर्च झाला ? केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळालेले अनुदान कुठे गेले ?”


* रस्ते अंधारात, अपघाताची वाट पाहतेय ग्रामपंचायत ? :- नगरदेवळा गावातून रेल्वे स्टेशनकडे जाणारा मुख्य रस्ता रात्रीच्या वेळी पूर्णपणे अंधारात बुडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. श्री स्वामी समर्थ मंदिर, महावितरण कार्यालय, पेट्रोल पंप यांसारखी महत्त्वाची ठिकाणे असतानाही रस्त्यावर प्रकाशव्यवस्था नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.


विशेष म्हणजे, पेट्रोल पंपापासून दुसऱ्या वाकणपर्यंत 35 ते 40 खांब आणि लाईट्स बसविण्यात आल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात फक्त दोनच दिवे सुरू असून उर्वरित परिसर अंधारात आहे. लाखो रुपये खर्च करून बसवलेले दिवे शोभेपुरते आहेत का ? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.


रात्री महिलांना, विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना या मार्गांने जातांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

* महादेव नगरमध्ये मूलभूत सुविधांचा बोजवारा :- ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 54/1, महादेव नगर (वॉर्ड क्रमांक 2) परिसरात नागरिकांना रस्ते, गटारी, स्ट्रिट लाईट आणि पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः संघर्ष करावा लागत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, वारंवार तक्रारी करूनही प्रशासन केवळ आश्वासनांची खैरात वाटत आहे. निवडणुकीच्या वेळी विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करणारे लोकप्रतिनिधी आता गायब झाल्याचा आरोप होत आहे.


* ग्रामसेवकांवर गंभीर आरोप : “बातम्यांनी काही होत नाही” अशी मानसिकता ? :- ग्रामसेवकांच्या कामकाजावरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्रामसेवक यांचे येणे-जाणे अनियमित असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. अनेक नागरिकांनी सांगितले की, समस्या मांडल्यावर केवळ “अर्ज करा”, “पाहतो”, “नंतर बघू” अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.


धक्कादायक बाब म्हणजे, “बातम्यांनी काही फरक पडत नाही… लोक बातम्या वाचतात आणि विसरून जातात” अशी प्रतिक्रिया ग्रामसेवकांनी एका नेत्यांकडे दिल्याची चर्चा गावात रंगली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला जनतेची भीती उरली नाही का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.


* ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्यांची नेमकी जबाबदारी काय ? :- महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि पंचायत राज व्यवस्थेनुसार ग्रामपंचायतीची प्रमुख जबाबदारी म्हणजे नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे. त्यामध्ये गावात स्वच्छता राखणे, गटारी व नाल्यांची साफसफाई करणे, स्ट्रीट लाईट व्यवस्था सुरू ठेवणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे, रस्त्यांची देखभाल करणे, पूर आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी उपाययोजना करणे, नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षेची काळजी घेणे या बाबींचा समावेश होतो. 


ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी असून त्याच्यावर गावाच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी, निधीचा वापर, स्वच्छता, कर वसुली आणि शासकीय योजनांची जबाबदारी असते. तर सरपंच आणि सदस्य हे गावाच्या विकासासाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत. मात्र नगरदेवळ्यातील परिस्थिती पाहता, “जबाबदारी फक्त कर वसुलीपुरतीच मर्यादित आहे का ?” असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत.


* विरोधक आणि सामाजिक संघटना गप्प का ? :- गावातील विरोधक आणि सामाजिक संघटनांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. निवडणुकीत एकमेकांवर आरोप करणारे नेते आता गावाच्या प्रश्नांवर शांत का आहेत ? सामाजिक कार्यकर्ते, संघटना आणि तथाकथित जनतेचे कैवारी कुठे गायब झाले ? अशी चर्चा गावात रंगली आहे.


* काम करायचे नसेल तर राजीनामा द्या :- ग्रामस्थांमध्ये आता तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. “ग्रामसेवकांना गावासाठी वेळ नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. लोकप्रतिनिधींना काम करायचे नसेल तर त्यांनी घरी बसावे,” अशी थेट प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये नगरदेवळेकर विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार की पुन्हा पैशांच्या राजकारणाला बळी पडणार ? याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.


* आंदोलन, उपोषण केल्याशिवाय प्रशासन जागणार नाही का ? :- नगरदेवळेकरांमध्ये आता संतापाची भावना तीव्र होत आहे. “निवेदन, आंदोलन, उपोषण आणि पत्रकार परिषद घेतल्याशिवाय प्रशासन जागत नाही का ?” असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

पावसाळ्यापूर्वी अग्नावंती नदीची तातडीने साफसफाई करावी, बंद असलेल्या स्ट्रिट लाईट सुरू कराव्यात, गटारींची दुरुस्ती करावी आणि महादेव नगरसह संपूर्ण गावातील मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.


* नगरदेवळेकर आता तरी जागे होणार का ? :- नगरदेवळा गावात विकासाच्या नावावर केवळ आश्वासने आणि राजकारण होत असल्याचा आरोप आता उघडपणे होऊ लागला आहे. “स्ट्रिट लाईट, रस्ते, गटारी आणि पूरमुक्त गाव हवे की निवडणुकीत मिळणाऱ्या 500 - 1000 रुपयांसाठी मत विकायचे ?” असा थेट प्रश्न आता नागरिक एकमेकांना विचारू लागले आहेत.

दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये नागरिक विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार की पुन्हा एकदा आश्वासनांना बळी पडणार ? याकडे संपूर्ण नगरदेवळ्याचे लक्ष लागले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement