Type Here to Get Search Results !

पाच रुपयांच्या चहात जपली अर्धशतकाची माणुसकी!

* नगरदेवळ्यातील ‘आशीर्वाद टी हाऊस’ म्हणजे गावाच्या गप्पा, व्यवहार आणि आठवणींचा जिवंत इतिहास

* 1974 च्या महापुरानंतर बिसमिल्लाह मामूंनी रोवला होता चहाच्या व्यवसायाचा पाया

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- बदलत्या काळात चहाचे दर वाढले, टपऱ्या बदलल्या, कॅफे संस्कृती आली, पण नगरदेवळा गावातील एक ठिकाण मात्र आजही आपल्या साधेपणाने आणि माणुसकीने लोकांच्या मनावर राज्य करीत आहे. पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा गावातील “आशीर्वाद टी हाऊस” हे केवळ चहाचे दुकान नाही, तर गावाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे.

विशेष म्हणजे, आजही येथे फक्त 5 रुपयांत चहा मिळतो. महागाईच्या काळात जिथे शहरांमध्ये एका कप चहासाठी 15 ते 30 रुपये मोजावे लागतात, तिथे नगरदेवळ्यातील आशीर्वाद टी हाऊस अजूनही सर्वसामान्य माणसाच्या खिशाचा विचार करीत आपली परंपरा जपत आहे.

* 1974 च्या महापुरानंतर उभा राहिला ‘आशीर्वाद’ :- आशीर्वाद टी हाऊसचा इतिहास जवळपास 50 वर्षांपूर्वीचा आहे. 1974 मध्ये आलेल्या महापुरानंतर गाव नव्याने उभारी घेत असतांना बिसमिल्लाह शेख वजीर उर्फ “बिसमिल्लाह मामू” यांनी या चहाच्या व्यवसायाचा पाया रचला. त्या काळात छोट्याशा टपरीत सुरू झालेला हा प्रवास आज नगरदेवळ्याच्या ओळखीचा भाग बनला आहे.


त्या काळी चहाचा कप म्हणजे फक्त पेय नव्हते, तर गावातील लोकांना एकत्र आणणारे माध्यम होते. बिसमिल्लाह मामूंनी लोकांना फक्त चहा दिला नाही, तर माणुसकीची ऊब दिली. हळूहळू आशीर्वाद टी हाऊस हे गावातील सर्वाधिक वर्दळीचे आणि विश्वासाचे ठिकाण बनले.


* पिढ्या बदलल्या…पण चहाची चव कायम :- आज या व्यवसायाची जबाबदारी महेबूब शेख व त्यांचे मोठे बंधू सादीक शेख बिसमिल्लाह सांभाळत आहेत, तर चालक म्हणून सैफुद्दीन नुरूद्दीन काझी काम पाहतात. विशेष म्हणजे, ज्या ग्राहकांनी लहानपणी येथे चहा प्यायला सुरुवात केली, त्यांची मुले आणि आता नातवंडेही याच ठिकाणी चहाचा आनंद घेताना दिसतात.


गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक सांगतात की, आमच्या आयुष्यातील कितीतरी महत्त्वाच्या चर्चा, निर्णय, राजकारण, मैत्री आणि आठवणी या आशीर्वाद टी हाऊसवरच घडल्या.


* गावातील “मिनी संसद” :- नगरदेवळ्यातील आशीर्वाद टी हाऊस हे फक्त चहाचे दुकान नसून गावातील “मिनी संसद” म्हणून ओळखले जाते. सकाळच्या वर्तमानपत्रापासून रात्रीच्या राजकीय चर्चांपर्यंत सर्व काही येथे रंगत असते. शेतकरी बाजारभावावर चर्चा करतात, तरुण रोजगार आणि शिक्षणावर बोलतात, पत्रकारांना बातम्यांचे धागेदोरे मिळतात, राजकीय कार्यकर्ते रणनीती आखतात आणि सर्वसामान्य नागरिक आपल्या समस्या मांडतात. गावातील लहान-मोठ्या व्यवहारांचे हे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे.


* “5 रुपयांचा चहा” म्हणजे माणुसकीचा स्वाद :- आज 5 रुपयांत काही मिळत नाही, अशी परिस्थिती असतांना आशीर्वाद टी हाऊस अजूनही सर्वसामान्यांसाठी परवडणारा चहा देत आहे. अनेक ग्राहक भावनिक होत सांगतात की, “हा फक्त चहा नाही…ही आमच्या गावाची ओळख आहे.” चहाची चव, साधेपणा, ग्राहकांशी जपलेले नाते आणि प्रत्येकाला आपलेसे वाटणारे वातावरण यामुळेच आशीर्वाद टी हाऊसने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.


* टी-लव्हर्ससाठी भावना बनलेले ठिकाण :- आज सोशल मीडियावर “टी लव्हर” हा ट्रेंड असला तरी नगरदेवळ्यात ही संस्कृती गेली अनेक दशके जिवंत आहे. पावसाळ्यातील गरमागरम चहा, सकाळच्या थंडीत मिळणारी ऊब, मित्रांच्या गप्पा आणि दिवसाचा थकवा घालवणारा कटिंग चहा… या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आशीर्वाद टी हाऊस आहे.


* अर्धशतक पूर्ण…पण माणुसकीची परंपरा कायम :- जवळपास 50 वर्षांचा इतिहास असलेल्या आशीर्वाद टी हाऊसने नगरदेवळ्यात चहाला एक वेगळी ओळख दिली आहे. बदलत्या काळातही साधेपणा, आपुलकी आणि सर्वसामान्यांशी जोडलेले नाते कायम ठेवणारे हे ठिकाण आजही गावाच्या हृदयात धडधडताना दिसते. नगरदेवळ्यात एखाद्या व्यक्तीला विचारले, “गावात सर्वात जास्त वर्दळ कुठे असते?” तर उत्तर बहुतेक वेळा एकच मिळते - “आशीर्वाद टी हाऊस!”

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement