* पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांच्या उपोषणाला यश
* राष्ट्रपुरुष दालनासाठी 10 लाखांच्या निधीची मागणी, प्रशासनाच्या हालचालींना वेग
कर्जत / नरेश जाधव :- पंचायत समिती कर्जत कार्यालयातील राष्ट्रपुरुष दालनाच्या जीर्ण आणि धोकादायक झालेल्या छताच्या दुरुस्तीचा प्रश्न अखेर प्रशासनाने गांभीर्याने घेतला असून पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश शांताराम कदम यांच्या उपोषणानंतर या कामाला गती मिळाल्याचे दिसून येत आहे.
कर्जत तहसील कार्यालयासमोर 25 मे 2026 पासून रमेश कदम यांनी विविध प्रलंबित प्रश्नांसह पंचायत समिती कार्यालयातील राष्ट्रपुरुष दालनाच्या जीर्ण छताचा मुद्दा लावून धरत उपोषण सुरू केले होते. राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा असलेल्या या दालनाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून छतावरील सिमेंट शीट तुटलेल्या अवस्थेत असल्याने नागरिक, कर्मचारी तसेच कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.
या आंदोलनाची दखल घेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी तातडीने रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांना पत्र पाठवून राष्ट्रपुरुष दालनासाठी नवीन छत उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
या पत्रात दालनाच्या छतावरील सिमेंट पत्रे जीर्ण व धोकादायक झाल्याचे नमूद करण्यात आले असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या कामासाठी सुमारे 10 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तसेच उपअभियंता (बांधकाम) यांना कामाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर अखेर सकारात्मक हालचाल सुरू झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, उपोषणकर्ते रमेश कदम यांनी राष्ट्रपुरुषांच्या सन्मानाशी संबंधित असलेल्या या विषयाकडे प्रशासनाने वेळेत लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांच्या आंदोलनामुळे हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून आता प्रत्यक्ष निधी मंजूर होऊन कामाला सुरुवात कधी होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाच्या या हालचालीचे स्वागत करीत राष्ट्रपुरुष दालनाची दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करून सुरक्षित व सुसज्ज दालन उभारण्याची मागणी केली आहे.


Social Plugin