Type Here to Get Search Results !

मुरुड आगाराला विविध समस्यांचा विळखा

* शिवसेना गटनेते पांडुरंग आरेकर यांची आगार प्रमुखांना धडक भेट

* बससेवा विस्कळीत, गाड्या रद्द, वेळापत्रकाचा बोजवारा ; प्रवाशांच्या हालअपेष्टांबाबत प्रशासनाला जाब

मुरुड / राजीव नेवासेकर :- मुरुड एसटी आगारातील वाढत्या समस्यांमुळे शहरासह तालुक्यातील प्रवासी वर्गाला मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद शिवसेना गटनेते पांडुरंग आरेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मुरुड आगाराला भेट देत आगार प्रमुख राहुल शिंदे यांच्यासमोर विविध समस्यांचा पाढा वाचला. आगाराचा कारभार सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

मुरुड आगारातून सुटणाऱ्या स्थानिक तसेच लांब पल्ल्याच्या बससेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेक गाड्या वेळेवर सुटत नसल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांचे मोठे नुकसान होत आहे. काही वेळा कोणतीही पूर्वसूचना न देता बस फेऱ्या रद्द करण्यात येत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.


तसेच प्रवासादरम्यान बस रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार वाढल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. नुकतीच सुरू करण्यात आलेली मुरुड-बोरिवली बससेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी कुरुळ परिसरात बसचे डाव्या बाजूचे चाक निखळल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेमुळे एसटीच्या देखभाल आणि तांत्रिक तपासणी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


यावेळी गटनेते पांडुरंग आरेकर यांनी प्रवाशांच्या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करीत बससेवा नियमित करणे, वेळापत्रकाचे काटेकोर पालन करणे, बसच्या देखभालीकडे विशेष लक्ष देणे तसेच प्रवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता अधोरेखित केली.


या भेटीदरम्यान उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत, विजय नाना पाटील, मनीष विरकुड, सभापती नगमाना खानजादे, नगरसेवक ॲंड. रुपेश पाटील आदी उपस्थित होते. उपस्थित लोकप्रतिनिधींनीही आगार प्रशासनासमोर विविध तक्रारी मांडत प्रवाशांच्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली.


दरम्यान, आगार प्रमुख राहुल शिंदे यांनी उपस्थितांनी मांडलेल्या समस्यांची दखल घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे. मात्र प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्षात कितपत सुधारणा होते, याकडे आता मुरुड तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement