Type Here to Get Search Results !

साहित्यिक दिनेश चव्हाण यांच्या ‘अधोरेखित’ काव्यसंग्रहाची विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी निवड

* कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए. व बी.ए. अभ्यासक्रमात संदर्भग्रंथ म्हणून समावेश ; चाळीसगावच्या साहित्य व कला क्षेत्रासाठी अभिमानाची बाब

चाळीसगाव / प्रवीण पवार :- आनंदीबाई बंकट मुलांच्या हायस्कूलचे ज्येष्ठ कलाशिक्षक, प्रसिद्ध चित्रकार, कवी व साहित्यिक दिनेश चव्हाण यांच्या ‘अधोरेखित’ या काव्यसंग्रहाची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम. ए. आणि बी. ए. अभ्यासक्रमासाठी संदर्भग्रंथ म्हणून निवड करण्यात आली आहे. या उल्लेखनीय यशामुळे चाळीसगावच्या साहित्य, कला आणि शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चित्रकला, साहित्य आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे दिनेश चव्हाण हे विद्यार्थ्यांमध्ये कलाशिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या चित्रकलेला राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले असून त्यांनी आपल्या कलाकृतींमधून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.


कुंचल्यातून रंगांची भाषा व्यक्त करणाऱ्या चव्हाण सरांनी कवितेच्या माध्यमातूनही साहित्यविश्वात वेगळी छाप पाडली आहे. त्यांच्या ‘अधोरेखित’ या काव्यसंग्रहातील कविता सामाजिक वास्तव, मानवी संवेदना, नातेसंबंध, जीवनमूल्ये आणि समकालीन प्रश्नांवर प्रभावी भाष्य करतात. त्यांच्या लेखनातील संवेदनशीलता, आशयघनता आणि अभिव्यक्तीची ताकद यामुळे या काव्यसंग्रहाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.


विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी संदर्भग्रंथ म्हणून झालेली निवड ही त्यांच्या साहित्यिक कार्याची मोठी दखल मानली जात आहे. या निर्णयामुळे पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांना त्यांच्या साहित्याचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या साहित्यकृतीला व्यापक शैक्षणिक मान्यता प्राप्त झाली आहे.


या यशाबद्दल चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळातील पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, माजी विद्यार्थी तसेच साहित्यप्रेमींनी दिनेश चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे.


त्यांच्या या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरेत आणखी एका मानाच्या पानाची भर पडली असून भविष्यातही त्यांच्या लेखणीतून आणि कुंचल्यातून दर्जेदार साहित्य व कलाकृतींची निर्मिती होत राहावी, अशा शुभेच्छा विविध स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहेत.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement