* आमदार उत्तमराव जानकरांची संतप्त प्रतिक्रिया
* विधान परिषद निवडणुकीत मतदान न करण्याची घोषणा
* राष्ट्रवादी (शरद पवार गट) तील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
सोलापूर / अनिल पवार :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येऊ लागले असून, आमदार उत्तमराव जानकर यांनी पक्षातील वरिष्ठ नेते मोहिते पाटील यांच्यावर गंभीर आरोप करीत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित करण्याच्या प्रक्रियेत आपल्या मुलाच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, ऐनवेळी मोहिते पाटील यांनी हस्तक्षेप करून वसंत देशमुख यांना उमेदवारी मिळवून दिल्याचा आरोप जानकर यांनी केला आहे.
"मोहिते पाटलांनी माझा केसाने गळा कापला," अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. उमेदवारी प्रक्रियेतील घडामोडींवर प्रश्न उपस्थित करतांना जानकर म्हणाले की, ज्यांच्या पाठीमागे स्वतःच्या तालुक्यात सुध्दा एकही मत नाही, अशा व्यक्तीला उमेदवारी मिळावी यासाठी मोहिते पाटील यांनी आग्रही भूमिका का घेतली, हा प्रश्न आहे.
यापूर्वीही मोहिते पाटील यांच्या भूमिकेबाबत आमदार अभिजीत पाटील आणि नारायण पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता स्वतःलाही त्याच अनुभवाला सामोरे जावे लागल्याचा दावा करीत जानकर यांनी पक्षातील निर्णय प्रक्रियेवर टीका केली.
दरम्यान, या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे उमेदवार वसंत देशमुख यांना मतदान करणार नसल्याची घोषणाही उत्तमराव जानकर यांनी केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जानकर यांच्या वक्तव्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये मोहिते पाटील विरुद्ध इतर नेते असा संघर्ष उघडपणे समोर येत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील वाढता अंतर्गत वाद आणि वरिष्ठ नेत्यांमधील मतभेद पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.


Social Plugin