Type Here to Get Search Results !

दिलीप भोईर व 21 जणांना सात वर्षांची सक्तमजुरी

* चोंढी नाक्यावर मारहाणीप्रकरणी जिल्हा न्यायालयाचा फैसला

रायगड / मानसी कांबळे :- चोंढी नाक्यावर घातक शस्त्रांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी शिंदे गटाशी संबंधित दिलीप उर्फ छोटमशेठ भोईर यांच्यासह 21 जणांना सात वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 3,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा अलिबाग जिल्हा न्यायालयाने गुरुवारी (30 ऑक्टोबर)  सुनावली. जिल्हा प्रमुख न्यायाधीश राजेंद्र सावंत यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. तर चार जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात विशेष सरकारी अभियोक्ता ॲंड. प्रसाद पाटील यांनी काम पाहिले. 13 वर्षांनंतर लागलेल्या या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.


* घटना 11 सप्टेंबर 2012 :- बहिरोळे येथील रुपाली थळे या चोंढीच्या व्हिटेवा कॉम्प्युटर क्लासमध्ये वर्ग घेत होत्या. त्यांच्या सहकाऱ्याला सामान आणण्यासाठी पाठवले असता क्लासबाहेर त्याच्यावर व मित्रावर शिवीगाळ व मारहाण सुरू असल्याचे लक्षात आले. वाद मिटवून क्लासमध्ये परतल्यानंतरही परिस्थिती चिघळली. यानंतर दिलीप भोईर व 25–30 साथीदार शस्त्रांसह क्लासमध्ये घुसले आणि रुपाली थळे, भूषण साबळे व शाहबाज खान यांच्यावर हल्ला केला. शिवीगाळ, धमकी, तोडफोड आणि तलवारीसह हल्ल्यांत रुपाली थळे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.


बचावासाठी धावून आलेल्या विजय थळे यांच्यावर तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. इतरांवरही लोखंडी शिगा, लाकडी दांडे व स्टम्पने मारहाण झाली. या हल्ल्यात मनिषा घरत यांनाही मारहाण करून गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास करण्यात आले. हे प्रकरण मांडवा सागरी पोलिस ठाण्यात दाखल झाले व तपासानंतर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.


* कोण दोषी ठरले ? :- दिलीप उर्फ छोटम भोईर, विक्रम साळुंखे, विक्रांत कुडतरकर, मकरंद भोईर, सज्जाद मुल्ला, हेमंत केळकर, विवेक कुडतरकर आदींचा समावेश आहे.  25 पैकी 21 आरोपी दोषी, तर 4 आरोपी निर्दोष ठरले.


* न्यायालयाचा निष्कर्ष :- प्रॉसिक्युशनने सादर केलेल्या साक्षीपुराव्यांवरील विश्वास दाखवत न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले आणि सात वर्षांची सक्तमजुरी सुनावली. चोंढी नाक्यावर झालेल्या या हल्ल्याने जिल्हा हादरला होता. 13 वर्षांच्या सुनावणीनंतर अखेर न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावत पीडितांना न्याय दिला आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement