* मंडलाधिकाऱ्यांची ‘फक्त पाहणी’ - पंचनामा कुठे ? ग्रामस्थांची तहसीलदारांकडे धाव
* सजा किरवली परिसरात गुपचूप वाळू, माती उत्खनन ; शेती, रस्ते आणि पर्यावरणाचा बळी
कर्जत / खलील सुर्वे :- कर्जत तालुक्यातील सजा किरवली परिसरात बेकायदेशीर माती, वाळू उत्खनन आणि भरावाचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु असून, या प्रकाराविरोधात ग्रामस्थांनी थेट तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली आहे. या भूमाफियांच्या कारवाया प्रशासनाच्या नजरेसमोर सुरू असूनही ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा खनिकर्म अधिकारी, कर्जत उपविभागीय अधिकारी (प्रातांधिकारी), कर्जत तहसिलदार आदींना निवेदन देणार आहेत.
* शेतजमिनीचे नुकसान, रस्त्यांची दुरावस्था, पर्यावरण धोक्यात :- स्थानिक नागरिकांच्या मते, परवानगीशिवाय जमीनीतून मोठ्या प्रमाणात माती काढण्यात येत आहे. या अवैध उत्खननामुळे शेतीपिकांचे नुकसान, खेडेगावातील रस्ते खचणे व तुटणे, पावसाळ्यात चिखल आणि पाणथळपणा, पर्यावरणीय समतोल बिघडण्याचा धोका हे परिणाम दिसून येत आहेत.
* मंडलाधिकारी आले...पण फक्त पाहणी करून गेले :- तक्रारदारांनी सांगितले की, त्यांनी या प्रकरणाची तोंडी तक्रार संबंधित मंडल अधिकाऱ्यांकडे दिली होती. त्यानंतर अधिकारी स्थळावर गेले, परंतु पंचनामा केला का ? कागदपत्रे तयार झाली का ? याबाबत काहीच पारदर्शकता नाही. ग्रामस्थांचा सवाल आहे की, फक्त पाहणी करून सेल्फी काढून परत येण्यासाठी अधिकारी असतात का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
* पंचनामा असला तर प्रत द्या - ग्रामस्थांची मागणी :- तक्रारदारांनी तहसीलदारांकडे निवेदन देऊन संबंधित पंचनाम्याची प्रती आणि फोटो मागितले आहेत. तसेच उत्खनन बेकायदेशीर असल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
* आता तहसीलदारांची कसोटी :- या तक्रारीनंतर तहसील कार्यालयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासन कारवाई करते का ? भूमाफियांवर गुन्हे दाखल होतात का ? उत्खनन थांबते का ? याकडे नागरिकांचे बारकाईने लक्ष आहे.
कायद्याच्या नावावर खडीगाळ सुरु केली जाते आणि नंतर खणून गाव उद्ध्वस्त केले जाते, यावेळी असे होऊ देणार नाही. किरवली गावात चालू असलेले उत्खनन थांबवून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे. अन्यथा ग्रामस्थांचा पुढचा मार्ग आंदोलनाचा असू शकतो, अशीही चर्चा आहे.


Social Plugin