* ओढ्याखाली सापडला कुजलेला मृतदेह…एका ‘टॅटू’ने उघड केली रक्तथंड हत्येची गोष्ट!
पुणे / प्रतिनिधी :- “प्रेमाच्या टॅटूने ओळख दिली…पण शेवटी त्याच टॅटूने मारेकऱ्याला जेलच्या दारात पोचवले!” भिगवण परिसर हादरवणारी ही घटना बारामती - भिगवण रोडवरील मदनवाडी गावच्या हद्दीत उघडकीस आली आहे. विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह चादरीत गुंडाळून ओढ्याखाली फेकून दिला.
* एका ‘टॅटू’ने उघडला खूनाचा खेळ :- 14 ऑक्टोबर रोजी दिपाली सुदर्शन जाधव बेपत्ता असल्याची तक्रार तिचा पती सुदर्शन उर्फ रविराज जाधव याने बारामती पोलिस ठाण्यात नोंदवली होती. मात्र, 12 ऑक्टोबरलाच त्याने लोखंडी वस्तूने डोक्यावर वार करून तिची हत्या केली होती. 24 तासांच्या आत पोलिसांनी या गूढ प्रकरणाचा उलगडा केला आहे, कारण मृत महिलेच्या डाव्या हातावर ‘रविराज’ असा टॅटू होता, तोच पुरावा ठरला पतीच्या गुन्ह्याचा साक्षीदार.
* चादरीत गुंडाळलेलं सत्य… ओढ्याखाली लपवलेलं पाप :- मदनवाडी येथे ओढ्याच्या पुलाखाली ब्लँकेटमध्ये बांधलेला कुजलेला मृतदेह आढळला. महिलेच्या डोक्यावर वार झाल्याचे स्पष्ट दिसत होते. त्या दृश्याने परिसर हादरला. “कोण आहे ही महिला ? कुणी केले हे भयानक कृत्य ?” असा प्रश्न उपस्थित झाला. स्थानिक गुन्हे शाखा, भिगवण पोलिस ठाणे आणि अंमलदारांची तीन पथके तातडीने तयार करण्यात आली आणि त्या एका टॅटूच्या धाग्याने पोलिसांनी उलगडा केला. खून करणारा दुसरा कोणी नाही, तर स्वतः पतीच!
* संशयाने पेटलेलं प्रेम आणि संपलं आयुष्य :- सुदर्शन उर्फ रविराजला पत्नीच्या “विवाहबाह्य संबंधांचा” संशय होता. 12 ऑक्टोबरच्या रात्री वाद वाढला…आणि रागाच्या भरात त्याने लोखंडी वस्तूने तिच्या डोक्यावर वार करीत तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून मदनवाडीत ओढ्याखाली फेकून दिला.
* पोलिसांची अचूक तपासणी :- भिगवण पोलिसांनी चौकशीत पतीच्या जबाबात अनेक विसंगती आढळल्या. शेवटी, काटेकोर तपास आणि पुराव्यांच्या आधारे रविराजने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, 31 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


Social Plugin