* भाजपकडून नगरदेवळा-बाळद जिल्हा परिषद गटासाठी दावेदारी दाखल
* विकासाचा ‘भोंगा’ वाजवत विरोधकांना दिला इशारा - यावेळी रथ आमचाच धावणार!
* ग्रामविकासाचे यशस्वी मॉडेल उभे करणार, रवी बाबा म्हणतात - सत्ता सेवेसाठी हवी, स्वार्थासाठी नव्हे !
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- राजकारणात काही नावे अशी असतात की ती उच्चारली की सभोवताली आदर, विश्वास आणि आत्मीयतेचे वलय तयार होते. आणि नगरदेवळा परिसरात असे नाव म्हणजे रविंद्र पुंडलिक पाटील ऊर्फ रवी बाबा! होय, “बस नाम ही काफी है!” असे म्हणावे इतके त्यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व प्रभावी आहे.
ज्यांच्या नावाने विरोधकांची झोप उडते, ज्यांच्या कामाने गाव बोलते, ते म्हणजेच - रवी बाबा! कारण नावातच आहे दम, आणि कामात विकासाचा सुगंध!
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नगरदेवळा-बाळद गटातून भाजपकडून दावेदारी दाखल करीत, रवी बाबांनी राजकीय वातावरणच ढवळून काढले आहे. त्यांच्या दावेदारीने विरोधकांची झोप उडाली असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.
* कृषी बाजार समितीपासून जिल्हा परिषदपर्यंत - सेवा तेच ध्येय :- रवी बाबा हे नगरदेवळा-बाळद कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडून आलेले सदस्य असून, उपसभापती पदावर असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आवाज दिला. तोलाचे भाव, बाजारातील पारदर्शक व्यवहार आणि शेतमालाच्या विक्रीसाठी सोयीसुविधा निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्याचबरोबर जळगाव मजूर फेडरेशनच्या माध्यमातूनही त्यांनी असंख्य कामगारांच्या समस्या सोडविल्या आहेत. शेतकरी असो वा मजूर रवी बाबा यांच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
* विकासाची गाथा बोलते - प्रचार नव्हे, परिणाम :- रवी बाबा हे शब्द नव्हे तर कामावर विश्वास ठेवणारे नेते आहेत. त्यांची पत्नी गेली दहा वर्षे सरपंच पदावर असून त्यांनी गावाच्या विकासाचा चेहरामोहराच बदलला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, गटारी, शाळा, स्वच्छता प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आदर्श उभा केला. वडील शिक्षक असल्याने समाजसेवा आणि प्रामाणिकपणाचे संस्कार बाळकडू घरातून मिळाले, आणि तेच त्यांच्या कामात दिसते. राजकारणाच्या रंगमंचावर ते मितभाषी पण प्रभावी खेळाडू मानले जातात. स्वभाव प्रेमळ, वागणे सुसंस्कृत आणि हृदय अगदी गावकऱ्यांचे!
* सत्ता सेवेसाठी हवी, स्वार्थासाठी नाही :- 'दै. कोकण प्रदेश न्यूज'शी बोलताना रवी बाबा म्हणाले की, विजयी झालो तर नगरदेवळा गावाचा मागील 60 वर्षांचा थांबलेला विकास मी पूर्ण करून दाखवेन. आमदार मंगेश चव्हाण आणि नेते गिरीश महाजन यांनी जशी आपल्या मतदारसंघाची दिशा बदलली, तशीच झेप नगरदेवळा-बाळद गटालाही मिळवून देईन.
त्यांनी पुढे ठामपणे सांगितले की, सत्ता सेवेसाठी हवी, प्रतिष्ठेसाठी नाही. भाजप नेतृत्वाने मला संधी दिली, तर हा मतदारसंघ विकासाच्या रथावर स्वार होईल आणि भाजपचा ‘बालेकिल्ला’ बनवून दाखवेन.
* यावेळी रथ रवी बाबांचाच :- नगरदेवळा-बाळद मतदारसंघात सध्या एकच चर्चा रंगली आहे की, बाबा मैदानात उतरले की, विरोधकांना वेळापत्रक बदलावे लागते. कारण, रवी बाबांच्या पाठीशी आहे मोठे कुटुंब, मजबूत संघटन, आणि गावागावातला लोकाभिमान त्यांच्या नावाने घराघरात चर्चा रंगतेय की, यावेळी रथ रवी बाबांचाच धावणार!
* भाजपला मिळणार विश्वासार्ह उमेदवार :- राजकीय तज्ञांचे मत स्पष्ट आहे की, नगरदेवळा गटात भाजपकडे रवी बाबा हे एक विश्वासार्ह, लोकाभिमानी आणि प्रामाणिक चेहरा आहे. त्यांचा विजय म्हणजे फक्त एका व्यक्तीचा नव्हे, तर गावागावातल्या जनतेचा आत्मविश्वासाचा विजय ठरणार आहे.


Social Plugin