Type Here to Get Search Results !

पाचोऱ्याची लढाई सत्तेसाठी नव्हे, प्रतिष्ठेसाठी !


* शिंदे गट व भाजप समोरासमोर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तंबू स्वतंत्र

* युतीचा सवाल अजूनही हवेत - अभिलाषा रोकडे ठरतायत नव्या समीकरणांची ‘डार्क हॉर्स’!

पाचोरा / फिरोज पिंजारी :- राजकारणात सत्ता येते-जाते, पण प्रतिष्ठा, ही एकदा गेली की परत मिळवणे कठीण आणि पाचोरा तालुक्यातील आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुका हीच प्रतिष्ठेची कसोटी ठरणार आहेत. यावेळी विधानसभा मतदार संघात लढाई सत्ता मिळवण्यासाठी नाही… तर ‘कोण मोठे ? कुणाला जनता मानते ? याचा हिशोब होणार आहे. 


* एकीकडे शिवसेना शिंदे गट :- शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील, त्यांच्या पाठीशी मंत्री गुलाबराव पाटील यांचा हात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाठबळ. राजकारणाच्या पटावर आप्पा सध्या ‘राजा’च्या घरात उभे आहेत. “आप्पा चालले की गड हलतो,” अशी म्हण कार्यकर्त्यांत ऐकू येते. त्यांच्या संघटनशक्तीला प्रशासनाचे पाठबळ आणि सत्तेच्या वाऱ्याची उचल घेतलेले पतंग - म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे सूत्र ठरलंय ‘सत्तेवर आहोत, आता सत्ता वाचवायची!’



* दुसरीकडे भाजपची ‘त्रिमूर्ती’ :- माजी आमदार दिलीप वाघ, कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या वैशालीताई सूर्यवंशी, आणि युवा चेहरा अमोल शिंदे ही त्रिमूर्ती आता सज्ज झाली आहे “आप्पा”च्या किल्ल्यावर झेंडा फडकविण्यासाठी. त्यांच्या पाठीशी आहेत पाचोरा-भडगांवचे पालक नेते आ. मंगेश चव्हाण आणि अर्थातच भाजपचे ‘संकटमोचक’ गिरीश महाजन ! या जोडीला थोडे सरकारचे राज्यातील अस्तित्व आणि भाजपचे संघटन मिळाले, तर हाच त्रिकोण लढाईचे समीकरण बदलू शकतो. राजकारणात शह देणे सोपे, पण मात देणे अवघड, आणि यावेळी पाचोऱ्याच्या पटावर दोन्ही बाजू शह-मातसाठी सज्ज आहेत.


* “तिसरा कोण?” अजितदादांच्या राष्ट्रवादीचा प्रवेश :- राजकीय हवामानाचा पारा वाढवत आहे अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट. ते कोणासोबत जाणार ? हा प्रश्न सध्या पाचोऱ्याच्या गल्लीपासून जिल्हा मुख्यालयापर्यंत चर्चेत आहे. मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र विभागीय युवती अध्यक्षा अभिलाषा भिला रोकडे यांनी पाचोरा-भडगांव तालुक्यात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. राजकारणात दोन हात चालतात, पण डाव फक्त तीच खेळते, जी हातात गुलाब धरूनही शह देऊ शकते!


नगरदेवळा पंचायत समिती गणातून अभिलाषाताई लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. महिला, युवक, आणि तरुणाईचा तिला प्रचंड पाठींबा आहे.



* ‘तीन पायांवरचा स्टूल’ - कोण तोलतो, कोण कोसळतो ? :- एकीकडे शिंदे गट, दुसरीकडे भाजप, आणि मधोमध अजितदादांची राष्ट्रवादी... आता प्रश्न फक्त “युती होणार का ?” इतकाच नाही, तर “कोण पहिलं पाऊल टाकणार ?” कारण पाचोरा-भडगांव नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सर्व निवडणुकांत एक एक मत सोन्याच्या किमतीचे ठरणार आहे. राजकारणात मित्र बदलतात, पण स्वार्थ कायम राहतो,  आता ही युती सत्तेची होणार की प्रतिष्ठेची हे पाहणे रंजक ठरणार आहे.



* अभिलाषा रोकडे - राजकारणातली ‘डार्क हॉर्स’ :- गेल्या काही वर्षांत अभिलाषा रोकडे यांनी जे संघटन केलंय, ते “युवती संघटनेतून राजकारणातला नवा अध्याय” ठरले आहे. त्यांच्या शांततेला सौम्यपणा समजणाऱ्यांनी आता सावध राहायला हवे. नगरदेवळा पंचायत समिती गणातून त्या “पूर्ण ताकदीने” लढणार आहेत. त्यांच्या समर्थनात महिला संघटना, युवक, तरुणाई आणि स्थानिक कार्यकर्ते रांगेत उभे आहेत. आणि हा पाठिंबा वाढला तर... पाचोऱ्याचे समीकरण पुन्हा लिहावे लागेल.


एक ओळीत सांगायचे झाले तर “राजकारणात कौल देते जनता, पण खेळ करतात नेते! आणि या वेळी पाचोऱ्याचं रणांगण होणार आहे प्रतिष्ठेचा ‘शह-मात’चा खेळ!”

दरम्यान, यावेळी मतपेटीतून नुसते चिठ्ठ्या नाही, तर अभिमानाचा निकाल निघणार आहे... पाचोरा - भडगांवच्या रणांगणात, ‘सत्ता कोणाची?’ पेक्षा ‘मर्यादा कोणाची?’ हा प्रश्न निर्णायक ठरणार आहे. 

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement