* सत्ता नसतानाही विकासाची उभारणी ; आमदार किशोर पाटील यांच्या विश्वासार्ह ‘युवा शिल्पकाराची’ पंचायत समिती उमेदवारी चर्चेत...सभापतीपदावर नजर, मतदारसंघात जोरदार लाट!
पाचोरा / फिरोज पिंजारी :- गेल्या काही वर्षांपासून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका न झाल्याने प्रशासनाचे सर्व अधिकार प्रशासकांच्या हातात होते. सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती कोणीच नव्हते... अशा परिस्थितीत अनेक गावांचा विकास ठप्प झाला. मात्र, काही निवडक लोकप्रतिनिधींनी सत्तेची खुर्ची नसतानाही आपल्या गावाचा कायापालट घडवून आणला. त्या ‘कोहिनूर हिऱ्यां’पैकी एक नाव आज सर्वत्र चर्चेत आहे, ते म्हणजे शितल सोमवंशी!
* गावाच्या विकासाचा शिल्पकार :- बाळद हे गाव पूर्वी छोटे आणि मर्यादित साधनसंपत्ती असलेले होते. पण शितल सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत गावाचा चेहरामोहराच बदलला आहे. आज गावात अनेक सुविधा उपलब्ध आहेत. “बाळद गावाला भाऊंनी ‘न भुतो न भविष्यती’ विकासाच्या रथावर स्वार केलंय,” असे ग्रामस्थ सांगतात. सोमवंशी यांनी फक्त गावापुरतेच नव्हे तर भडगांव तालुक्याशी जोडणारा रस्ता तयार करून भौगोलिक अडथळा संपवला आहे. या रस्त्यामुळे बाळद परिसराचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक चेहराही उजळला आहे.
* नेतृत्व जे बोलत नाही, काम करून दाखवते :- पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका न होता देखील शितल सोमवंशी यांनी आपल्या संपर्कातून, जनसंपर्कातून आणि नेतृत्त्वाच्या बळावर गावात निधी आणला. त्यांनी शासकीय योजनांचा योग्य वापर करून बाळदला विकासाच्या नकाशावर उठून दिसेल असे काम केले. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे नगरदेवळा जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वाधिक विकास झालेला गट म्हणजे बाळद गण, असा ठसा उमटला आहे.
* चर्चेतली पहिली उमेदवारी :- निवडणुकीचा बिगूल वाजताच सर्वांचे लक्ष बाळदकडे लागले. पाचोरा तालुक्यातील पहिली अधिकृत उमेदवारी जाहीर झाली ती म्हणजे शितल सोमवंशी यांची! ते बाळद पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार असून, त्यांच्या उमेदवारीची घोषणा होताच परिसरात प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की, “भाऊ, पंचायत समिती नको, थेट जिल्हा परिषद लढा!” असे संदेश, फोन, आणि बैठकीतून मागण्या होत आहेत.
* सत्ता आली, तर सभापती तुम्हीच :- मात्र, शितल सोमवंशी यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या आदेशाला मान देत पंचायत समितीची लढाई स्विकारली आहे. आमदारांनी त्यांना स्पष्ट आश्वासन दिले आहे की, “सत्ता आली, तर सभापती तुम्हीच!”
हा शब्दच शितल सोमवंशींसाठी प्रेरणादायी ठरला आहे. सभापती झाल्यानंतर पाचोरा तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठा विकास घडवून आणण्याची त्यांची स्वप्ने आहेत.
* राजकीय समीकरणात नवा ‘गेमचेंजर’ :- आज बाळद ग्रामपंचायतीपासून पंचायत समितीपर्यंत सोमवंशींचे नाव घराघरात पोहोचले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक तरुण कार्यकर्ते आणि मतदारसंघातील नागरिक त्यांच्यामागे ठामपणे उभे आहेत. राजकीय पंडितांच्या भाषेत सांगायचे झाले तर नगरदेवळा जिल्हा परिषद मतदारसंघात लढाई कोणीही लढो, पण चर्चेचे केंद्रबिंदू शितल सोमवंशीच असतील, हे स्पष्ट आहे.
* जनतेचा विश्वास आणि नेतृत्वाची छाप :- गावात विकास झाला की नावं ऐकू येतात, पण जेव्हा गावचे नशीब बदलते, तेव्हा लोक नाव अभिमानाने घेतात. आज बाळदचे शेतकरी, महिला, तरुण, आणि वृद्ध सगळेच एकच वाक्य उच्चारतात “भाऊ आले म्हणजे काम झालेच समजा!”


Social Plugin