* पारंपारिक लोककला सनई-संबळ वादन जिवंत ठेवण्यासाठी वाघमारे बंधूंच्या कुटुंबीयांचा उपक्रम - ग्रामीण कलाकारांचा राज्यस्तरीय सन्मान!
अ. नगर / प्रतिनिधी :- “डीजेच्या आवाजात हरवलेली लोककला पुन्हा जागवण्याचा सनईचा शंखनाद!” असेच काहीसे दृश्य संगमनेर तालुक्यातील खळी गावात पाहायला मिळाले. येथे नुकताच ‘राज्यस्तरीय सखा–सुखा सनई वाजंत्री पुरस्कार वितरण सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. हा पुरस्कार सोहळा सनई–संबळ परंपरेला अखंड ठेवणारे दोन भावंड सखाराम विश्राम वाघमारे आणि सुखदेव विश्राम वाघमारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आला होता. या कलावंतांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात ग्रामीण लोककलांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला नवा आत्मा दिला होता.
* सनई–संबळाचा वारसा आणि वाघमारे बंधूंची परंपरा :- खळी गावातील ‘सखा–सुखा सनई वाजंत्री ताफा’ हा महाराष्ट्रात लोकनाट्य, तमाशा, यात्रा आणि लग्न सोहळ्यांमध्ये एक ओळख बनला होता. सखाराम आणि सुखदेव वाघमारे या दोघा भावांनी सनई वादन कलेला आपल्या श्वासासारखे जपलं. त्यांच्या सनईचा सूर आकाशवाणीपासून ते आंतरराष्ट्रीय परिषदांपर्यंत पोहोचला. या जोडीच्या निधनाने या क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी या परंपरेचा ‘वारसा’ कायम ठेवण्याचा निर्धार करीत दरवर्षी ‘सखा–सुखा राज्यस्तरीय वाजंत्री पुरस्कार’ देण्याची सुरुवात केली आहे.
* ग्रामीण कलाकारांचा सन्मान :- या वर्षी सखाराम वाघमारे यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील उत्कृष्ट वादकांचा सन्मान करण्यात आला. राज्यस्तरीय सखा–सुखा वाजंत्री पुरस्कार प्राप्त कलाकार : सर्जेराव दौलतराव कदम (पाथरे) – उत्कृष्ट सनई वादक, रामा हिरा वाघमारे (खळी) – प्रसिद्ध सुर वादक, उत्तम लहानु कदम (पिंपरी लौकि) – उत्कृष्ट सनई वादक, रावजी देवजी कदम - सनई वादक, सुनिल खरात (मालुंजे) - उत्कृष्ट संबळ वादक या सर्व कलावंतांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि स्मृतिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यात निवृत्त परिवहन अधिकारी शिवाजी केरू कदम, निवृत्त मुख्याध्यापक पांडुरंग वाघमारे, राजहंस दूध संघाचे चेअरमन राजेंद्र चकोर, दाढ बुद्रुक सेवा सोसायटी चेअरमन भाऊसाहेब पाळंदे, बौद्ध महासभेचे प्रचारक संजय कांबळे आणि बाल भिक्खु यांचा समावेश होता.
* लोककला, अंधश्रद्धा आणि बुद्धविचारांवर प्रेरणादायी प्रवचन :- संजय कांबळे यांनी आपल्या भाषणात लोककला, अंधश्रद्धा निर्मूलन आणि बुद्धांच्या शिकवणीबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, सनई-संबळ ही केवळ कला नाही, ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे. ही कला टिकवली नाही, तर आपण आपल्या मुळांपासून तुटू.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉं. रमेश वाघमारे यांनी केले. संदीप तांबे, शिवाजी वाघमारे, तान्हाजी कदम, राजेंद्र लहानु कदम आणि पुरस्कार समितीच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी अशोक वाघमारे यांनी आभार मानले.


Social Plugin