Type Here to Get Search Results !

महादुला नगरात गुन्हेगारीचा वाढता सुळसुळाट!

* गुन्हेगारांना पोलिसांची भीती उरली नाही - वंचित बहुजन आघाडीचा इशारा

* तत्काळ पेट्रोलिंग सुरू करा ; गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांना निवेदन सादर

कोराडी - महादुला (नागपूर) / प्रतिनिधी :- महादुला नगर पंचायत क्षेत्रातील झोपडपट्टी परिसर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी नागरिकांचे जीवन त्रस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष ताराचंद काळे यांनी 26 ऑक्टोबर 2025 रोजी कोराडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक यांना निवेदन देऊन, तत्काळ पोलिस पेट्रोलिंग सुरू करण्याची मागणी केली आहे.


महादुला नगरातील जयभीमनगर, श्रीनिवासनगर, रमाईनगर, सिद्धार्थनगर, कव्वापारा, महात्मा फुलेनगर या भागात गुन्हेगारी घटनांचा सुळसुळाट झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या भागात रंगदारी आणि भाईगिरी, चोरी आणि घरफोड्या, दारूच्या नशेत शिवीगाळ, तीक्ष्ण हत्यारे बाळगणे, महिलांवर आणि तरुणींवर छेडछाड, आठवडी बाजारात गोंधळ आणि दहशत अशा घटना वारंवार घडत असूनही पोलिसांचा वचक दिसत नाही. या भागात गुन्हेगार राज्य करतायत का ? असा संतप्त प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.


वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष ताराचंद काळे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, दररोज सायंकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत चार्ली पोलिस ताफा नियमितपणे गस्तीसाठी फिरला पाहिजे. पोलिसांनी प्रत्येक भागात पेट्रोलिंग पॉइंट निश्चित करून रजिस्टर ठेवावे. पेट्रोलिंग झाल्यानंतर नागरिकांच्या सहीनेच नोंद घ्यावी आणि ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावी. अशी यंत्रणा उभारल्यास, पोलिसांचे उत्तरदायित्व वाढेल आणि स्थानिक गुन्हेगारीला आळा बसू शकेल, असेही काळे यांनी नमूद केले.


मजदूर चौक - महेश साखरे यांच्या घराजवळ, श्रीनिवासनगर - प्रदीप काळे यांच्या घराजवळ, सिद्धार्थनगर - सम्राट अशोक बुद्ध विहार परिसर या ठिकाणी कायमस्वरूपी पोलिस पेट्रोलिंग रजिस्टर ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.


या निवेदनाची प्रत महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांना अग्रेषित करण्यात आली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चित्रकूट वासे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement