Type Here to Get Search Results !

यात्रौत्सवात यंदा भक्तिभाव कमी अन् राजकारणाच्या रथाची ओढाताण जास्त !

* देणगी नाकारल्यावर नेत्याला सोशल मीडियावर चांगलेच सुनावले

* ‘गावाचे नाही म्हणणारे’ निवडणुकीत गावात कशाला येतात ? असा रोखठोक सवाल

पाचोरा / विशेष प्रतिनिधी :- तालुक्यासह खान्देशात सध्या यात्रौत्सव, रथौत्सव व जत्रा सुरू झाल्या आहेत. दिवाळीनंतर गावोगावी भक्तीचा मेळा रंगू लागला आहे. त्यातच पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या निवडणुकीचा बाजार देखील गरम झाला आहे. निवडणुकीत विरोध दाखविला किंवा एखाद्याने उमेदवारीसाठी दावेदारी दाखल केली की, मग सुरू होतात...वादविवाद, राजकिय द्वेष, मत्सर, दुश्मनी...मग त्याचे रूपांतरण कधी कधी शिवीगाळ आणि हाणामारीत होते...सध्या याचा प्रयत्य अनेक ठिकाणी येत आहे. दरम्यान, पंचक्रोशीतील प्रसिद्ध यात्रौत्सव म्हणजे श्रद्धा, एकोपा आणि भक्तिभावाचा मिलाफ!


दरवर्षी गावकरी जातीपातीचा विचार न करता, देवभक्तीच्या ओढीने देणगी देतात, रथ सजवतात आणि उत्सव रंगवतात. पण या वर्षी रथाच्या चाकात राजकारणाचा पाय अडकलाय. देणगी गोळा करायला गेलेल्या काही तरुणांना एका नेत्याने सरळ नकार देत, “मी या गावाचा नाही!” असे सांगितले आणि मग त्यातून सोशल मीडियावर उडाला “श्रद्धा विरुद्ध अहंकाराचा रणसंग्राम!”


देवाच्या नावाने दरवर्षी होत असलेला हा रथोत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम नाही, तर तो गावकऱ्यांच्या एकतेचे प्रतीक आहे. मात्र, यावेळी देणगी देताना काही नेत्यांनी “गावाचे नाही” असे सांगून हात झटकला, तर लोकांनी लगेच सोशल मीडियावरून त्यांना "देव विसरलात, पण मत विसरत नाही" असा टोला लगावला.


एका भक्ताने सडेतोड प्रश्न उपस्थित केला आहे की, देणगी द्यायची नाही, चालेल...पण मग निवडणुकीत गावात मत मागायला का येता ? यावर गावातील वातावरण चांगलेच तापले आहे.


काहींनी सांगितले की, देणगी ही स्वखुशीने दिली पाहिजे, ती जर बळजबरीने वसूल केली गेली तर ती देणगी नाही, खंडणी ठरते. भारतीय न्यायसंहिता कायद्यानुसार खंडणी वसुली हा गुन्हा आहे, असे सांगून काही तथाकथित धर्मप्रेमींनी स्वतःला “कायद्याचा विद्यार्थी” दाखवले. पण भक्तांच्या मते, देवाच्या नावाने देणगी देताना गावाचे नाव बघायचे नसते...श्रद्धा असली की देव सर्वत्र असतो, असे सांगत त्यांनी या राजकारणाच्या नौटंकीला झोडपून काढले.


गावात काही भक्तांनी उपरोधाने म्हटले की, आरतीचा मान द्यायचा नाही, हे ऐकून रथाच्या चाकालाही हसू आले असावे. काही जणांनी तर थेट म्हटले की, देणगी नको द्यायला, पण देवाचे नाव घेऊन मत मागायचे ही भक्ती नव्हे, ही ‘राजकीय भिक्षा’ आहे.


देवाचा रथ म्हणजे श्रद्धेचा प्रवास पण यंदा हा रथ भक्तिभावापेक्षा “राजकीय ओढाताणीत” अडकला आहे. देणगी मागणे व देणे हा हक्क किंवा कर्तव्य नाही, तो भावनेचा भाग असतो पण काहींना वाटते, “देणगी” द्यायची की नाही, तेही मतांच्या गणितावर ठरतंय!


गावकऱ्यांचा ठाम संदेश आहे की, गाव आपले, देव आपला, आणि मग माणूसही आपलाच हवा! देवासाठी दिलेले योगदान राजकारणाचे साधन बनवू नका.


काही युवक व नागरीकांनी देणगी देण्याबाबत नाराजी व्यक्त केली नसली तरी त्या नेत्याने देणगी न देण्यासाठी जे शब्द विचारले...त्यावरून सोशल मिडीयावर रणसंग्राम, संताप, राग व्यक्त करण्यात येत आहे.


यात्रौत्सवानिमित्त तरुण वर्ग पावती मागण्यासाठी गेलेले असता मी या गावाचा नाही, अशी प्रतिक्रिया दिल्याने मदतीसाठी गावाचे नाही, मग मत मागायला का येता ? असा प्रश्न विचारला जात आहे....तसेच आगामी निवडणुकीत मते मागू नका असा सूर ही व्यक्त होत आहे.


देणगी नाकारल्यानंतर त्या नेत्याने वापरलेल्या शब्दांवरून सोशल मीडियावर चांगलाच रणसंग्राम पेटलाय. व्हॉट्स अँप ग्रुपवर नागरिक, तरुण आणि भक्त वर्ग या प्रकरणावर संताप, रोष आणि उपरोध व्यक्त करीत आहेत. गावाचे नाही म्हणणारे, मत मागायला गावात कशाला येतात ? असा एकमुखी सूर आता सर्वत्र घुमतोय. देवाच्या नावाने देणगी मागताना गाव पाहिले जाते, पण मत मागताना सगळा तालुका आपला होतो, असा टोला लगावण्यात येत आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement