* पैसा, पद आणि राजकीय गणितांच्या सावलीत सेवा व निष्ठेची घुसमट
* निवडणुका समोर ; तिकीट वाटपात कार्यकर्ते दुय्यम, धनदांडगे पुढे
* निष्ठा, त्याग आणि जनसेवेची किंमत घसरली, पक्ष संघटनासमोर गंभीर प्रश्न
कर्जत / राजेंद्र शिवाजी जाधव :- “राजकारण म्हणजे जनसेवा” हा मंत्र भारतीय लोकशाहीचा पाया मानला जातो. पण वास्तवाकडे पाहिल्यास आजची राजकीय व्यवस्था सेवाभावापेक्षा सत्ता, पद आणि पैशाच्या खेळात अडकलेली दिसते. निवडणुका जवळ आल्या की पक्षांत तिकीट वाटपाचा हंगाम सुरू होतो आणि त्याच वेळी एक कटू सत्य समोर येते. पक्षासाठी आयुष्य झिजवलेले तळागाळातील कार्यकर्ते मागे पडतात, तर आर्थिक सामर्थ्य आणि ताकद दाखविणारे पुढे येतात.
* निष्ठावंत कार्यकर्ते मागे, धनिक मंडळी पुढे :- गावोगावात पाऊस-वादळात झटणारे, जनतेच्या दुःखात धावून जाणारे, पक्षाची ध्वज-होडी खांद्यावर घेणारे कार्यकर्ते निवडणुकीच्या समीकरणात मात्र दुय्यम ठरतात. पैसा आणि प्रचार यंत्रणेत गुंतवणूक करण्याची क्षमता हे प्राथमिक निकष बनले. परिणामी अनेक विद्वान, निष्ठावान, प्रामाणिक कार्यकर्त्यांची मनोभूमिका खचते.
* आयुष्यभर सतरंज्या उचलाव्यात, पण तिकीट मागू नये का ? :- कार्यकर्त्यांच्या मनातला हा प्रश्न आता जोरदार उमटू लागला आहे. त्यांचा त्याग, जनता-संपर्क, संघटनशक्ती आणि निष्ठा असूनही तिकीट मिळत नाही, त्यामुळे मनात वेदना, असंतोष आणि विश्वासघाताची भावना निर्माण होते.
* संघटनात्मक ढासळती परिस्थिती :- कार्यकर्ते दुर्लक्षित झाल्यावर ते निष्क्रिय होतात, कडवट बनतात किंवा स्वतंत्र उभे राहतात. कधी प्रतिस्पर्धी पक्षाला पाठिंबा देतात यामुळे पक्षाच्या पायाभूत रचनेवरच घाला येतो.
* लोकशाहीत पैसा vs सेवा :- लोकशाही मजबूत होण्यासाठी सेवा, चारित्र्य, प्रामाणिकता आणि संघटनशक्ती आवश्यक असते, परंतु पैशाची सत्ता निर्णायक बनत आहे. हे ट्रेंड पक्षांना आणि लोकशाहीला दोघांनाही धोकादायक आहेत.
* पक्षांनी घ्यावयाची दिशा :- तिकीट वाटपात पारदर्शकता असेल कार्यकर्त्यांचा विश्वास वाढेल सेवाभाव, निष्ठा, लोकसंपर्क यांना प्राधान्य दिल्यास योग्य नेतृत्व पुढे येईल. कार्यकर्त्यांच्या योगदानाचा सन्मान संघटन बळकट होईल. तरूणांमध्ये मूल्याधारित राजकीय शिक्षण भविष्यात स्वच्छ राजकारणाचा पाया आहे.
राजकारणाचा मूळ आत्मा आहे...जनसेवा, निष्ठा आणि समाजहित. परंतु पैशाच्या प्रभावाने हा आत्मा दबत चालला आहे. सत्ता क्षणिक कहे, सेवा आणि निष्ठा शाश्वत असते. राजकारण पुन्हा मुळाकडे वळले तरच पक्ष आणि कार्यकर्ते यांच्यातील विश्वासाचे नाते अटळ राहील.


Social Plugin