* कै. शांताराम बापूजी जाधव यांचे वृद्धापकाळाने निधन
* ग्रामीण शिक्षण क्षेत्रात अपूर्व योगदान ; हजारो विद्यार्थ्यांना दिली ज्ञानगंगा!
* विरार परिसर शोकसागरात - बापूजींची परंपरा, आदर्श आणि शिक्षणाची मशाल सदैव प्रेरणादायी राहील
वसई / नरेंद्र एच. पाटील :- विरार पूर्व ग्रामीण भागात शिक्षणाची ज्योत पेटविणारे आणि हजारो गरीब विद्यार्थ्यांचे जीवन घडविणारे शिक्षणतज्ज्ञ कै. शांताराम बापूजी जाधव यांचे सोमवारी (27 ऑक्टोबर) वृद्धापकाळाने निधन झाले. थळ्याचा पाडा, भाताणे (विरार पूर्व) येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने ग्रामीण शिक्षणाचा पाया घालणारा एक महान वटवृक्ष उन्मळून पडल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
* गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा दीप पेटविला :- ग्रामीण भागातील सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली व्हावीत, या उद्देशाने दिवंगत बापूजी बाबाजी जाधव यांनी चांदिप येथे बापूजी बाबाजी जाधव स्मारक विद्यामंदिरची स्थापना केली होती. या संस्थेचा पाया त्यांच्या सुपुत्रांनी कै. शांताराम जाधव यांनी अधिक बळकट केला. त्यांनी केवळ शाळा उभारली नाही, तर त्या माध्यमातून शिक्षणाची क्रांती घडवली.
* शालेय शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सुविधा उपलब्ध करून दिल्या :- पूर्वी चांदिप परिसरात विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिक्षणासाठी वसई-विरारसारख्या शहरी भागात स्थलांतर करावे लागायचे. ही समस्या लक्षात घेऊन कै. शांताराम जाधव यांनी चांदिप येथे कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना केली, जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षणाची संधी मिळेल. त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि इंग्रजी शिक्षणाच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. एकेक वर्ग वाढवत आज ती शाळा दहावीपर्यंतचे शिक्षण पुरवते. त्याचबरोबर त्यांनी चांदिप येथे पदवी अभ्यासक्रमासाठी महाविद्यालय सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा संपूर्ण प्रवास दिला.
* शिक्षणासोबत संस्कारांची परंपरा :- कै. शांताराम जाधव हे केवळ शिक्षणतज्ज्ञ नव्हते, तर ते एक समाजघटक आणि संस्कारशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या संस्थेत शिक्षणाबरोबरच नैतिक मूल्ये, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यावरही भर दिला जात असे. त्यांचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत असून, समाजात त्यांच्या योगदानाची छाप स्पष्ट दिसते.
* उतारवयातही पायात भिंगरी :- शांताराम जाधव हे आजारपणातही शिक्षणसंस्थांमध्ये नियमित जात असत. शरीर साथ देत नसतानाही ते विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी, शिक्षकांच्या समस्यांसाठी आणि नवीन उपक्रमांसाठी झटत राहिले. त्यांच्या निधनाने केवळ एक व्यक्ती नव्हे, तर एक युग संपले असल्याची भावना स्थानिक नागरिकांत व्यक्त होत आहे.
* संस्थेचे उपाध्यक्ष आणि समाजकार्याची परंपरा :- कै. जाधव हे आगाशी - विरार - अर्नाळा शिक्षणसंस्थेचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेत अनेक नावीन्यपूर्ण बदल केले. त्यांचे मार्गदर्शन हे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले.


Social Plugin