Type Here to Get Search Results !

कर्जत तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर!


* भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ; हवालदिल शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत!

* तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी - जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर

* सामाजिक कार्यकर्ते तथा शिवशाही युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर शेळके यांच्या माध्यमातून निवेदन सादर

कर्जत / नरेश जाधव :- कर्जत तालुक्यात परतीच्या पावसाने (अवकाळी पाऊस) पुन्हा एकदा शेतीवर संकट ओढवले आहे. अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे भातपिक पूर्णपणे कोमेजून गेले असून, काही ठिकाणी शेतात उभे असलेले पीक जमिनीवर पडले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.


तालुक्यातील अनेक गावांमध्ये कर्जत, पळसद, कोठिंबे, भिवपुरी, तळेगाव, भातगाव आणि परिसरात सलग दोन दिवसांपासून पावसाचा जोरदार मारा होत आहे. या मुसळधार पावसामुळे नुकतेच कापणीस तयार झालेले भात पिक शेतातच कोसळून पाण्यात बुडाले. परिणामी, पिकाची गुणवत्ता खराब झाली असून, शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी सांगितले की, या पिकावर आमचे वर्षभराचे उत्पन्न आणि कर्जफेड अवलंबून होते, पण आता सर्व काही वाहून गेले.


या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी रायगड, तहसीलदार कर्जत आणि कृषी अधिकारी कर्जत यांना सामाजिक कार्यकर्ते तथा शिवशाही युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर शेळके यांच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात मागणी करण्यात आली आहे की, तातडीने पंचनामे करून नुकसानीचे अचूक मूल्यांकन करण्यात यावे, आणि शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा लाभ लवकर मिळावा.


शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाने पीकविमा योजनेखाली तत्काळ मदतीचे नियोजन करावे, अन्यथा येणाऱ्या रब्बी हंगामासाठी बी-बियाणे घेणे देखील अशक्य होईल.


कर्जत तालुक्यातील भातपीक हे मुख्य उत्पादन असून, शेतकऱ्यांचा संपूर्ण आर्थिक आधार या हंगामावरच अवलंबून असतो. अवकाळी पावसामुळे फक्त पीक नाही, तर शेतकऱ्यांची स्वप्ने आणि मेहनत दोन्ही वाहून गेली आहेत. प्रशासनाने तत्काळ पंचनामे न केल्यास शेतकऱ्यांचा संताप उसळू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


कर्जत तहसील कार्यालयाकडून प्राथमिक अहवाल मागविण्यात आला असून, कृषी विभागाकडून पंचनामे करण्यासाठी पथके तयार केली गेली आहेत, अशी माहिती सूत्रांकडून समजते. जिल्हाधिकारी रायगड यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे की, नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून पात्र शेतकऱ्यांना मदतीचा लाभ दिला जाईल.



Top Post Ad

Below Post Ad

Advertisement