Type Here to Get Search Results !

नगरदेवळ्यातील रणसंग्राम पेटला!

* उद्धव सेनेचा दबंग प्रवेश ; प्रकाश काटकर मैदानात

* भाजप - शिवसेना शिंदे गटाचे गणित विस्कटणार!

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे रणांगण सजले आहे. पक्षांचे सभागृह तापले, कार्यकर्त्यांचे डोळे पेटले, तर मतदारांचे मन वळविण्याच्या तयारीला उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतीच उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची भडगाव-पाचोऱ्याची महत्त्वाची बैठक  भडगांव येथे पार पडली. संपर्क प्रमुख सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक इच्छुकांची उपस्थिती दिमाखदार होती. त्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते नाव प्रकाश काटकर! होय… नगरदेवळा पंचायत समिती गणातून प्रकाश काटकर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे 

* चौरंगी लढत निश्चित :- नगरदेवळा गणात आता सामना भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये असेल. सध्या जेथे सरकार-सरकारची लढाई सुरू आहे, तेथे उद्धव सेनेच्या प्रवेशामुळे समीकरणे बदलणार हे मात्र नक्की. उध्दव सेनेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ मिळण्याची शक्यता आहे.


* काटकरांची प्रतिमा - लढवय्या, निडर, प्रामाणिक :- प्रकाश काटकर हे नाव स्वतःमध्ये एक भूमिका आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे, प्रखर पारदर्शकता मांडणारे आणि गाव-परिसरातील प्रत्येक समाजघटकात आदर असलेले व्यक्तिमत्व. त्यांच्या रिंगणात येण्याने विरोधकांचा काटा अडकलाय, तर समर्थकांमध्ये जिंकण्याचा आत्मविश्वास उफाळला आहे. निवडणूक लढवायचीच…आणि जिंकायचीच!” असा निर्धार प्रकाश काटकर व उध्दव सेनेने केला आहे.


* उद्धव सेनेचा दम - आता गावखेड्यातही शिवगर्जना :- राजकारणात आज सत्ता नसेल…पण लोकांच्या मनावर राज्य उद्धव ठाकरेंचंच आहे, हे ग्रामीण भागात सिद्ध होत आहे. मोठा प्रश्न असा आहे की, उद्धव सेनेच्या या रेट्याने भाजप - शिवसेना शिंदे गटांपैकी कोणाचा पाया हादरणार ? या निवडणुकीला केवळ मतपत्रिका नसून…जनतेच्या विश्वासाचा, गावाच्या भविष्याचा आणि राजकीय नैतिकतेचा प्रश्न आहे. आता बघायचे आहे की, सत्ता - शक्ती जिंकते की प्रामाणिक लढाई ? गाव ठरवेल आणि इतिहास लिहिला जाईल.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement